- संजय आवटे(संपादक, पुणे)
‘एक्झिट पोल’च्या सर्व आकड्यांना खोटे ठरवणारे निकाल देशभरात बघायला मिळाले. पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, बारामती, शिरूर, मावळ, नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघांत अत्यंत अटीतटीच्या लढतीत सहापैकी चार मतदारसंघांत महाआघाडीचा करिष्मा दिसला. पुणे आणि मावळ लोकसभा मतदारसंघांत महायुतीचा विजय झाला. पक्षफुटीमुळे निर्माण झालेल्या सहानुभूतीचा फायदा महाआघाडीच्या उमेदवारांना मिळाला. तर, पुणे आणि मावळ महायुतीने राखले असले तरी गेल्या निवडणुकीपेक्षा मताधिक्यात घट झाली आहे. अजित पवारांचे दोन्ही उमेदवार भाजपची आणि शिंदेसेनेची साथ न मिळाल्यामुळे पराभूत झाले. एकसंध महाविकास आघाडी आणि विखुरलेली महायुती असा हा सामना होता.
पुणे : पुण्यात रवींद्र धंगेकर यांनी चांगली लढत देऊन भाजपच्या या बालेकिल्ल्याला धडक दिली. मात्र, निवडणूक व्यवस्थापन आणि काँग्रेसमधील कुरबुरींचा फटका त्यांना बसला. मुरलीधर मोहोळ यांची आणि भाजपची यंत्रणा सोबत चालल्याचा फायदा झाला. महापौर म्हणून तयार झालेल्या प्रतिमेमुळेही मोहोळ आघाडीवर राहिले.
बारामती : सहानुभूतीमुळे लोकसभा मतदारसंघातील जवळपास सर्वच विधानसभा मतदारसंघ सुप्रिया यांच्या पाठीशी राहिले. भारतीय जनता पक्षाने अजित पवारांचे काम केले नाही. भाजपचा प्रभाव असलेल्या भागातही सुप्रिया चालल्या.
अहमदनगर : विखे कुटुंबीयांचे वाढते महत्त्व कमी करण्यासाठी भाजप मैदानावर फार ॲक्टिव्ह नसल्याचे सुरुवातीपासूनच बोलले गेले. शेतकऱ्यांमधील असंतोष आणि सहानुभूतीचा फायदा नीलेश लंके यांना मिळाला.
शिरूर : शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे पक्षांतर मतदारांना रुचले नाही. डॉ. अमोल कोल्हे यांना सहानुभूतीचा फायदा झाला. मावळ : श्रीरंग बारणे यांना भाजपची साथ मिळाल्यामुळे विजय शक्य झाला. संजोग वाघिरे यांना सहानुभूती मतात परावर्तित करता आली नाही.
शिर्डी : सदाशिव लोखंडे यांचा कमी झालेला जनसंपर्क आणि स्थानिक समीकरणांचा फायदा भाऊसाहेब वाघचौरे यांना झाला.