Maharashtra Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राजधानी मुंबईतील छत्रपती शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची सभा होत आहे. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र आलेले बघायला मिळाले. त्यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांसह अनेक नेते उपस्थित आहेत. दरम्यान, यावेळी फडणवीसांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'शिवाजी पार्कवर बोलत असताना बाळासाहेब ठाकरेंची गर्जना आठवते. ते म्हणायेच, माझ्या तमाम हिंदू माता आणि भगिनींनो… हीच गर्जना आम्ही उद्धव ठाकरे यांच्याकडून ऐकायचो. पण इंडिया आघाडीची बैठक झाली, त्यांनी सांगितले हे चालणार नाही. तेव्हापासून उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले. ही शोकांतिका आहे. बाळासाहेबांची सभा व्हायची तेव्हा भगवा झेंडा, कडवट हिंदू, शिवरायांचे मावळे असे शब्द ऐकायला मिळायचे. आता उद्धव ठाकरेंच्या भाषणात बाप चोरला, घरी बसून काम करणार, गझनी, माझे कुटुंब माझी जबाबदारी यापलिकडे काही ऐकायला येत नाही', असा टोला फडणवीसांनी लगावला.
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
ते पुढे म्हणतात, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात दहा वर्षात देशाने परिवर्तन पाहिले. ते परिवर्तन मुंबईचा बदललेला चेहरा सांगतो. मेट्रो, अटल सेतू, गरिबांना मिळणारी घरे, धारावीचा विकास सांगतो. इंडिया आघाडीवाले काहीच सांगू शकत नाही. कोव्हिडच्या काळात मोदींनी देशातील शास्त्रज्ञांना एकत्र करुन भारतात लस तयार केली आणि 140 कोटी भारतीयांना दिली. तेव्हा उद्धव ठाकरे सरकार खिचडीचा घोटाळा करत होते, रेमडिसिव्हीरचा घोटाळा चालवत होते, ऑक्सिजनचा घोटाळा सुरू होता. प्रेतावरचे लोणी खाण्याचे काम सुरू होते. यांना धडा शिकवला पाहिजे,' अशी टाकाही फडणवीसांनी केली.