कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 02:09 PM2024-05-04T14:09:50+5:302024-05-04T14:10:45+5:30
Maharashtra Lok Sabha Election2024: कांदा निर्यातबंदी हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे. आता कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’, असा असल्याची टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी हटवण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यामुळे ४० टक्के निर्यातशुल्ल लावून कांदा निर्यात करता येणार आहे. केंद्र सरकराच्या या निर्णयाचं सत्ताधारी महायुतीकडून स्वागत होत आहे. मात्र कांदा निर्यातबंदी हटवण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर काँग्रेसने टीका केली आहे. आता कांदा निर्यात बंदी उठवण्याचा निर्णय म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’, असा असल्याची टीका काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.
केंद्र सरकारच्या कांदा निर्यातबंदी हटवण्याच्या निर्णयावर टीका करताना बाळासाहेब थोरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, कांद्यावरील निर्यातबंदी उठवण्यात आल्याच्या निर्णयाबाबत ऐकतोय. याआधीही तीन महिन्यांपूर्वी निर्यातबंदी उठवली म्हणून साखर वाटपही झालंय. सत्कार झाले. इथल्या खासदारांनीही सत्कार स्वीकारले. मात्र नंतर तो निर्णय गुजरातमधील पांढऱ्या कांद्याबाबत झाल्याचं कळलं. शेतकऱ्यांकडे कांदा शिल्लक असता तर या निर्णयाचा फायदा झाला असता. शेतकऱ्यांच्या कांद्याची मातीमोल भावानं विक्री झाली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. आता निर्यातबंदी उठवून काही उपयोग नाही. बैल गेला अन झोपा केला, असा हा निर्णय आहे, अशी टीका बाळासाहेब थोरात यांनी केली.
दरम्यान, कांदा निर्यातबंदीमुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. निवडणुकीचा विचार करून कांदा निर्यातबंदीचा निर्णय मागे घेण्यात आला, अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे.