व्यूहरचना जोरात; कोण कुणाला ‘चेकमेट’ देणार?
By यदू जोशी | Published: April 19, 2024 06:13 AM2024-04-19T06:13:51+5:302024-04-19T06:13:55+5:30
लोकसभेतील एकेका मतदारसंघाचे राजकीय समीकरण आपल्या बाजूचे करण्यासाठी राज्यातील मोठ्या नेत्यांनी गुंतागुंतीची गणिते घातली आहेत!
यदू जोशी, सहयोगी संपादक लोकमत
लोकसभेची निवडणूक राष्ट्रीय मुद्द्यांवर आणि ‘पंतप्रधानपदी कोण हवे’ यावर लढली जाते. पण, त्याला राज्याचे संदर्भ असतातच. महाराष्ट्रात तर प्रादेशिक आणि लोकसभानिहाय गणिते वेगळी आहेत. त्यामुळेच एकमेकांना चेकमेट देत एकेका मतदारसंघाचे राजकीय समीकरण आपल्या बाजूचे करण्यासाठी राज्यातील मोठ्या नेत्यांनी बरीच ऑपरेशन्स केली आहेत. माढ्यातील मोठे ऑपरेशन शरद पवार यांनी केले.
काही वर्षांपूर्वी दुरावलेले बडे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांना जवळ केले. धैर्यशील मोहितेंना उमेदवारी दिली. मोहितेंनंतर उत्तम जानकरही पवारांसोबत जात आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या दिल्लीतील श्रेष्ठींनी मोहिते पाटील, रामराजे निंबाळकर यांचा दबाव न मानता रणजितसिंह निंबाळकरांची उमेदवारी कायम ठेवली. फडणवीस यांनी इतकी जोखीम कशाच्या आधारे घेतली असेल? भाजपची आपली ताकद आणि अजित पवारांचे माढा-सोलापुरातील शिलेदार हा त्या जोखमीचा आधार असावा. एक नक्की की माढ्याची निवडणूक ही मोहिते पाटील घराण्यासाठी करो वा मरोची असेल. बारामतीतील नणंद-भावजयीच्या लढाईत पवार घराण्यावर वर्चस्व कोणाचे, याचा फैसला होणार आहे. माढा मोहितेंचे भवितव्य ठरवेल.
महादेव जानकरांना परभणीचे तिकीट देऊन फडणवीस-अजित पवारांनी धनगर समाजाला खूश करत पश्चिम महाराष्ट्रातील या समाजाच्या मतांचा हिशेब नक्कीच केला असेल. त्याचवेळी शरद पवार यांनी उत्तम जानकर यांना गळाशी लावले. महादेव जानकरांनी यू टर्न घेतल्यानंतर पवारांना दुसरे जानकर हवे होतेच. माढामार्गे बारामतीत सुप्रिया सुळे यांना फायदा कसा होईल, याची काळजी मोठे पवार घेत आहेत. शरद पवार, फडणवीस यांचे एकमेकांना शह देण्याचे राजकारण सुरूच आहे. कोल्हापुरात छत्रपती शाहू महाराजांना काँग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यात मोठी भूमिका शरद पवारांचीच होती.
बारामतीनंतर शरद पवारांची सर्वांत जास्त प्रतिष्ठा कुठे पणाला लागलेली असेल तर ती साताऱ्यात. हा मतदारसंघ त्यांचा बालेकिल्ला; पण, लोकसभेत तो त्यांच्यासोबत राहणार की फडणवीस-अजित पवार जोडीकडे जाणार, याचा निर्णय होणार आहे. काकांच्या गडाला मित्राच्या मदतीने सुरुंग लावण्याचा अजित पवारांचा प्रयत्न आहे. शिवाय हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मूळ जिल्हा आहे. शरद पवार गटाला महाविकास आघाडीत १० जागा मिळाल्या, अजित पवारांना चारच मिळाल्या. मविआ आणि महायुतीचा विचार करता सर्वांत कमी जागा अजित पवारांना मिळणे हा त्यांच्यासाठी राजकीय सेटबॅक आहे. पण, त्याचा दुसरा अर्थ असाही आहे की इतर ठिकाणी मविआला धक्के देण्यासाठी अजित पवारांकडे पुरेसा वेळ असेल. त्याचा फायदा भाजप नक्कीच करून घेईल. बारामतीत सुनेत्रा पवारांना निवडून आणणे आणि शरद पवार ज्या १० जागा लढत आहेत तिथे त्यांना फारसे यश मिळू न देणे यात अजित पवार यशस्वी झाले तर दिल्लीत त्यांचे मार्क्स वाढतील. हे सगळे त्यांच्या लक्षात येते की नाही ते माहिती नाही. कारण वादग्रस्त विधाने करून त्यावर खुलासे करण्यातच सध्या त्यांचा वेळ जात आहे. शरद पवार यांनी महायुतीला शह देण्यासाठी जे राजकीय कौशल्य पणाला लावले ते मुख्यत्वे बारामती केंद्रित होते.
त्याच कौशल्याचा फायदा काँग्रेसला विदर्भात किंवा सांगलीचा तिढा सोडविण्यासाठी ते करून देऊ शकले असते. पण, तसे झालेले दिसत नाही. शिवाय, त्यांनी आणि उद्धव ठाकरेंनी विदर्भात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी सभा का घेतल्या नसाव्यात, याचीही चर्चा रंगली आहे. महाविकास आघाडीच्या सरकारचा प्रयोग यशस्वी करताना पवारांनी घेतलेला पुढाकार यावेळी दिसत नाही. महायुतीत बरेच काही चालले आहे. तेच ते उमेदवार दिल्याने काही ठिकाणी नाराजी आहे, शेतमालाच्या भावावरूनही नाराजी आहे, राज्याचे विषय प्रचारात आले हे त्यांना अडचणीचे ठरत आहे. पण, काँग्रेस व मित्रपक्षांना ते कॅश करता येत नाही. आपल्या विरोधातील सर्व मुद्द्यांवर ‘ब्रँड मोदी’ हा अक्सीर इलाज आहे, असे वाटत असल्यानेच भाजपने निवडणूक मोदींभोवती फिरती ठेवली आहे. पडद्यामागेदेखील अनेक ऑपरेशन्स झाली आहेत; होत आहेत. कोणाला विधान परिषदेचा शब्द दिला आहे तर कोणाला विधानसभेचा. हे सगळ्याच पक्षांत होत आहे.
एकनाथ शिंदेंचे काय होईल?
एकनाथ शिंदेंचे दहा उमेदवार आतापर्यंत जाहीर झाले. (देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे यांची उमेदवारी जाहीर केली आहे.) आणखी तीन-चार जागा त्यांना मिळतील. तुलनेने कमी आमदार, खासदार असूनही उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीत २१ जागा पदरी पाडल्या. पण, शिंदेंकडे इतके आमदार, खासदार असूनही त्यांना एवढ्या जागा मिळवता आल्या नाहीत, अशी तुलना सध्या सुरू आहे. प्रश्न किती जागा मिळतात, यापेक्षा किती निवडून आणता येतात, हा आहे. जास्त जागा तर घेतल्या; पण, त्यातल्या अनेक पडल्या तर उद्या हसे व्हायचे. त्यापेक्षा मिळाल्या त्या जागांचा स्ट्राइक रेट जास्त असणे हे अधिक महत्त्वाचे आहे. शिंदेंनी निवडणुकीत फिल्डिंग बरोबर लावली आहे. एकेका मतदारसंघात आपले सरदार पेरले आहेत आणि त्यांना भरपूर रसदही दिली आहे. शेवटी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाचे यश हे कोण जास्त जागा निवडून आणतो यातच असेल. शिवसेनेचे बव्हंशी आमदार, खासदार शिंदेंसोबत आहेत हे वास्तव असले, तरी शिवसैनिक ठाकरेंसोबत आहेत हे जे चित्र उभे केले जात आहे त्याचा फैसलाही निवडणुकीत होणार आहे. जाता जाता : रत्नागिरी-सिंधुदुर्गची जागा अखेर भाजपकडे गेली. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना उमेदवारी मिळाली. ‘मातोश्री’चे निष्ठावंत विनायक राऊत विरुद्ध आक्रमक राणे यांच्यात सामना रंगेल. राणे मैदानात आले, आता राडे अटळ आहेत.