रामटेक - Narendra Modi In Ramtek ( Marathi News ) इंडिया आघाडीतील नेते पूर्ण ताकदीने देशातील जनतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करतायेत. काँग्रेसनं एक देश, एक संविधान लागू होऊ दिले नाही. संविधानाच्या नावावर खोटं पसरवणाऱ्यांना माझा सवाल आहे. जर संविधानाची काळजी होती मग बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान पूर्ण भारतात लागू करण्याची हिंमत का केली नाही. ७० टक्के संविधान पूर्ण देशात लागू होऊ दिले नाही. परंतु आम्ही काश्मीर ते कन्याकुमारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान लागू केले. काँग्रेसनं कलम ३७० कायम ठेवले, जम्मू काश्मीरचे संविधान वेगळे होते, कलम ३७० हटवल्यानंतर आग लागेल असं काँग्रेस बोलत होती, मग कुठे आग लागली का? बाबासाहेब आंबेडकर जिथे कुठे असतील ते मोदींना आशीर्वाद देतील अशा शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंडिया आघाडीवर हल्लाबोल केला.
रामटेकमध्ये महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदी आले होते. यावेळी ते म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत विरोधक लोकशाही वाचवा असा नारा देतात. आणीबाणीच्या काळात लोकशाही धोक्यात नव्हती का? एका गरीबाचा मुलगा पंतप्रधान झाला म्हणून लोकशाही, संविधान धोक्यात असल्याचं दिसू लागलं. इंडिया आघाडी कधीही गरिबांना पुढे येताना पाहू शकत नाही. या गरीब मुलावर कितीही हल्ला केला मोदी देशातील जनतेच्या सेवेपासून मागे हटणार नाही. इंडिया आघाडीतील नेते पूर्ण ताकदीने देशातील जनतेत फूट पाडण्याचा प्रयत्न करतायेत. जर लोक एकत्र आले तर यांचे राजकारण धोक्यात येईल. त्यामुळे जनतेला आवाहन आहे, एकजूट होऊन देशाच्या नावावर मतदान द्या. इंडिया आघाडी ताकदवान झाली तर देशात फूट पडेल असा घणाघात त्यांनी केला.
तसेच इंडिया आघाडीतले समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतायेत. रामटेकमध्ये प्रभू रामाचे पाऊल पडले आहे. यावेळी रामनवमीला अयोध्येत रामलल्ला टेंटमध्ये नव्हे तर भव्य मंदिरात दर्शन देतील. ५०० वर्षांनी हा क्षण आला होता. जेव्हा रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची वेळ आली तेव्हा इंडिया आघाडीतल्या लोकांनी निमंत्रणही नाकारले. सनातनवर हल्ले करतात, सनातन संपवणाऱ्यांसोबत सभा घेत आहेत. हिंदू धर्माच्या शक्तीला संपवण्याचा घाट इंडिया आघाडीचे नेते करतायेत. या आघाडीला महाराष्ट्रात एकही जागा जिंकू देणार का? या निवडणुकीत त्यांच्या पापाची शिक्षा द्या असं आवाहन मोदींनी जनतेला केले.
दरम्यान, विकसित भारताच्या संकल्पासाठी मतदान करायचं आहे. टीव्ही, मीडिया सातत्याने सर्व्हे दाखवतायेत, त्यात एनडीएचा बंपर विजय दाखवला पाहिजे. परंतु सर्व्हेला मीडिया इतका खर्च का करते? पैसे वाचण्याचा एक फॉर्म्युला सांगतो, जेव्हा मोदींना शिव्या जास्त पडतील, माझ्या आई वडिलांवर शिव्या देतील, ईव्हीएमवर शंका उपस्थित करतील तेव्हा समजून जा, पुन्हा एकदा असं मोदींनी जनतेला विचारले, तेव्हा लोकांनी मोदी सरकार असा नारा दिला. आज नागपूरमध्ये एम्स, आयआयएम, मेडिकल कॉलेज, मेट्रो, अमरावतीत टेक्सटाईल पार्क बनतंय. बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाने या संपूर्ण भागात विकास होतोय. १० वर्षात विकासाची बरीच कामे झालीत. परंतु हा ट्रेलर आहे. पुढील ५ वर्षात आपल्याला देश आणि महाराष्ट्र खूप पुढे घेऊन जायचा आहे. प्रत्येक क्षण देशासाठी, प्रत्येक क्षण तुमच्यासाठी असंही मोदींनी म्हटलं.
घराणेशाहीच्या पक्षांनी नेहमी संविधानाचा अपमान केला
भाजपा-शिवसेना-राष्ट्रवादी एकत्रित येऊन तुमच्यासमोर आलेत. त्यामुळे तुमचे एक मत महायुतीच्या विजयासाठी आहेस परंतु इंडिया आघाडीतील नेत्यांना शिक्षा देण्यासाठीही आहे. काँग्रेसनं देशात वंचित शोषितांना कायम मागे ठेवले. बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला नाही. जेव्हा भाजपाचं सरकार आले तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांना भारतरत्न दिला. २०१४ ला सरकार आले तेव्हा एक मागासवर्गीय समाजातील व्यक्ती देशाचे राष्ट्रपती बनले. २०१९ ला पुन्हा आले तेव्हा आदिवासी समाजातील महिलेला राष्ट्रपती बनवले. घराणेशाहीच्या पक्षाने नेहमी संविधानाचा अपमान केला, सामाजिक न्यायाचा दुरुपयोग करत घराण्यातील लोकांनाच पुढे आणले. या लोकांच्या कारकिर्दीत एससी, ओबीसी हे योजनांपासून वंचित राहिले. आज एनडीए सरकारनं प्रत्येक घटकापर्यंत योजना पोहचवल्या, लाभ थेट खात्यात पोहचतो. त्यामुळे भ्रष्टाचार कमी झाला. शौचालय, वीज, पाणी, गॅस गॅरंटी याचे लाभार्थी एससी, एसटी, ओबीसी कुटुंब मोठ्या प्रमाणात आहे. आज २५ कोटी जनता गरिबी रेषेच्या बाहेर आली असं मोदींनी सांगितले.
कलम ३७० हटवल्याचा फायदा वंचित घटकांना
कलम ३७० हटवल्यानंतर काँग्रेसचे अध्यक्ष म्हणतात, कलम ३७० हटवल्याने देशाला फायदा काय झाला, ही भाषा तुम्ही ऐकू शकता का? कलम ३७० हटल्यानंतर जम्मू काश्मीरमध्ये दलित, शोषित, एसटी, एससी समाजाला पहिल्यांदाच घटनात्मक अधिकार मिळाला. भारताचा नागरिक म्हणून जे अधिकार हवेत तेदेखील इतकी वर्ष मिळाले नव्हते. काँग्रेस आणि इंडिया आघाडीला हे विचारले तर राग येतो, संविधानाच्या नावावर देशातील जनतेला मुर्ख बनवण्याची भाषा करते. काँग्रेस CAA चा विरोध करते, कारण त्याचे लाभार्थीही एससी, एसटी, दलित आहेत अशी टीका मोदींनी केली.
विकसित भारताच्या निर्माणात शेतकरी मजबूत स्तंभ
इंडिया आघाडी विकासाच्या विरोधात आहे. गोसीखुर्द योजनेला काँग्रेसनं कित्येक दशके प्रलंबित ठेवले, एनडीए सरकार येताच वेगाने काम सुरू झाले, गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना लाभ झाला. विकसित भारताच्या निर्माणात शेतकरी मजबूत स्तंभ आहे. PM स्वनिधी अंतर्गत हजारो कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचले. २०१४ आधी काँग्रेस सरकारने ६०० कोटी डाळ एमएसपीवर खरेदी केली. त्यावेळी कृषिमंत्री कोण होते माहिती आहे ना..६०० कोटीची डाळ आम्ही गेल्या १० वर्षात सव्वा लाख कोटी एमएसपीवर शेतकऱ्यांकडून खरेदी केली.