Vijay Wadettiwar on Devendra Fadnavis : लोकसभा निवडणुकीत देशात भाजपला सर्वात जास्ता जागा मिळाल्या असल्या तरी महाराष्ट्रात याऊलट चित्र आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीला ३० तर महायुतीला केवळ १७ जागा मिळाल्या आहेत. भाजपला २८ जागा लढवून केवळ ९ जागा जिंकता आल्या आहेत. त्यामुळे भाजपच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जात आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली आहे. तसेच पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी पक्षनेतृत्वानं मला सरकारमधून मोकळं करावं, अशी मागणी केली आहे. यावर आता विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी फडणवीसांना खोचक टोला लगावला आहे.
भाजपच्या पराभवानंतर पत्रकार परिषदेत घेत देवेंद्र फडणवीस यांनी आम्ही कमी पडलो असे म्हटलं आहे. तसेच पक्षनेतृ्त्वाने मला सरकारमधून मोकळे करावी असे म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीसांच्या या घोषणेनतंर राज्यात मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. दुसरीकडे फडणवीसांनी राजीनाम्याचे संकेत दिल्याने सरकार धोक्यात आल्याची चर्चा सुरु झालीय. यावर बोलताना विजय वडेट्टीवार यांनी हे सरकार जितके दिवस असेल तेवढाच आमचा फायदा होईल, असं विधान केलं आहे.
"ही भाजपची अंतर्गत बाब आहे त्यामुळे त्याबाबत बोलण्याची गरज नाही. भाजपला जनतेने नाकारले आहे. महाराष्ट्रात भाजपला नऊ जागा मिळाल्या आहेत. यामुळे राज्याचे आणि केंद्राचे नेतृत्व अपयशी ठरलं आहे. आता ते सावरण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षाची वाताहत झाल्यानंतर ते जबाबदारी घेऊन राजीनामा देण्याच्या निर्णय घेत असतील तर त्यांचे पक्ष नेतृ्त्व निर्णय घेईल. हे सरकार जितके दिवस असेल तेवढाच आमचा फायदा होईल. राज्यात भाजपचे नेतृ्त्व देवेंद्र फडणवीस करतात हे सर्वांनाच माहिती आहे. मग विजयाची जबाबदारी घेता तशी पराभवाची देखील घ्यायला हवी," असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
"देवेंद्र फडणवीस हे मोठे आणि जिगरबाज नेते आहेत. त्यांनी पळून जावू नये. राज्यात भाजपला त्यांनी २२ जागांवरुन ९ जागांवर आणले आहे. लोकसभेला जो निकाल आला तसाच निकाल विधानसभेला येईपर्यंत त्यांनी थांबावे. ते पळून जाणारे नेते नाहीत. दोन पक्षांच्या जिवावर ते सरकार बनवून ते काम पाहत आहेत. त्यांनी अद्याप निर्णय घेतलेला नाही," असा खोचक टोलाही वडेट्टीवार यांनी लगावला.