Baramati Lok Saha Result :बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी मोठ्या फरकाने विजय मिळवला. पवार कुटुंबियांसाठी प्रतिष्ठेची मानली जाणाऱ्या या नणंद भावजय लढतीत सुप्रिया सुळे यांनी बाजी मारली आणि अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. बारामतीमधल्या महायुतीविरुद्ध पवार कुटुंबिय अशा लढतीकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले होते. शरद पवार यांनी देखील बारामतीमध्ये तळ ठोकला होता. या निवडणुकीत पवार कुटुंबियांमध्ये बरेच आरोप प्रत्यारोप देखील झाले. मात्र आता सुप्रिया सुळे यांनी या निवडणुकीत विजय मिळवला. मात्र आता निवडणुकीनंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांना सल्ला दिला आहे.
बारामती लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा १ लाख ५८ हजार ३३३ मतांनी पराभव केला. या निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबिय निवडणुकीच्या रिंगणात उतरलं होतं. यावेळी अजित पवार यांच्यावर त्यांचे बंधु श्रीनिवास यांनीही जोरदार टीका केली होती. तसेच बऱ्याच पवार कुटुंबियांना सुप्रिया सुळे यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यामळे अजित पवार बारामतीमध्ये एकटे पडल्याची चर्चा सुरु झाली होती. अजित पवार यांनी सुप्रिया सुळेंना थेट लक्ष्य देखील केले होते. सुप्रिया सुळे यांनी त्यावेळी अजित पवार यांना त्यावेळी प्रत्युत्तर देणे टाळलं होतं. मात्र आता निवडणूक जिंकल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांबाबत भाष्य केलं आहे.
निवडणूक जिंकल्यानंतर गुरुवारी सुप्रिया सुळे या बारामतीमध्ये आल्या होत्या. त्यावेळी त्यांची विजयी मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर सुप्रिया सुळे यांनी पत्रकार परिषदत घेत पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरं दिलं. यावेळी पत्रकाराने अजित पवार यांना काय सल्ला द्याल असा सवाल करण्यात आला. यावर उत्तर देताना सुप्रिया सुळे यांनी हात जोडत मी सल्ला देत नाही तर घेते असं म्हटलं आहे.
“मी एक सुसंस्कृत मराठी मुलगी आहे. आपल्यापेक्षा वयाने, कर्तृत्वाने आणि नात्याने जे मोठे असतात, त्यांना सल्ला द्यायचा नसतो, त्यांच्याकडून सल्ला घ्यायचा असतो”, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
दरम्यान, बारामतीमधून सुप्रिया सुळे चौथ्यांदा खासदार म्हणून निवडून गेल्या आहेत. यंदाच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना ७ लाख ३२ हजार ३१२ मते मिळाली. तर सुनेत्रा पवार यांना ५ लाख ७३ हजार ९७९ मते मिळाली आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहापैकी पाच विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळेंनी मोठं मताधिक्य घेतलं.