मुंबई : भोंग्याविरोधातील आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी बुधवारी संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक एकोप्याचे सुखद चित्र पुन्हा एकदा पहायला मिळाले. राजनीतीकडे दुर्लक्ष करीत सर्वसामान्य नागरिकांनी शांततेच्या मार्गाने जाणेच पसंत करीत महाराष्ट्रात आवाज सलोख्याचाच आहे, यावर मोहोर उठविली.
आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वत्र विशेषत प्रार्थनास्थळांसमोर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. तथापि बहुतांश मस्जिदींमध्ये पहाटेची अजानची मुळी भोंग्याविना पार पडली. तसेच अनेक ठिकाणांवरील भोंग्यांचा आवाज आपणहून कमी केल्याचे दिसून आले. त्यामुळे कोणाचाच आवाज बंद करण्यासाठी पोलिसांना कुठेही बळाचा वापर करावा लागला नाही.
मनसे कार्यकर्त्यांना रात्री प्रतिबंधात्मक नोटिसा बजावल्यानंतर पोलिसांनी सकाळी खबरदारी म्हणून काही स्थानिक नेतेमंडळींना ताब्यात घेतले. अनेक शहरांमध्ये पोलिसांनी सर्वधर्मिय बैठका घेऊन शांतता राखण्याचे आवाहन केले होते. त्याचाही चांगला फायदा झाल्याचे दिसून आले.
शिर्डी व शनिशिंगणापुरातही आरतीचा भोंगा बंदअहमदनगर शहरातील मशिदींतून एकही अजान ध्वनिक्षेपकावर दिली गेली नाही. शिर्डी व शनिशिंगणापुरातही आरती ध्वनिक्षेपकावर झाली नाही.
न्यायालय काय करते तेही पाहायचे आहेसर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले असतानाही भोंगे कसे काय वाजतात, असा प्रश्न करतानाच न्यायालयाच्या निर्णयाचा अशा पद्धतीने अवमान केला जातो. यावर न्यायालय काय करते, हे मला पाहायचे आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
औरंगाबादेत सामाजिक एकोप्याची आरतीशहरातील संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चेलीपुरा भागात बुधवारी हिंदू-मुस्लीम व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन ‘वरद हस्ताय’ गणपती मंदिरात आरती केली. रमजान ईदनिमित्त एकमेकांना मिठाई भरवली.