राज्यात आघाडी सरकारला धोका नाही : एच. के. पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2021 09:43 AM2021-07-12T09:43:13+5:302021-07-12T09:49:41+5:30
काँग्रेसच्या पाठीत वार, नाना पटोले यांचा आरोप
व्यंकटेश केसरी
महाराष्ट्रातील महाविकास आघाडीत काँग्रेसच्या पाठीत वार केला जात असल्याचा उघड आरोप प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला असला तरी पक्षाचे महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी राज्यातील सरकारला धोका नाही. ते त्याचा कार्यकाळ पूर्ण करील, असे म्हटले. नाना पटोले यांनी केलेल्या वादग्रस्त आरोपांपासून चार हात दूर राहताना अखिल भारतीय काँग्रेस समितीने उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला धोका नाही, असे रविवारी रात्री स्पष्ट केले.
“महाविकास आघाडी सरकार त्याचा कार्यकाळ पूर्ण करील. काम करणारे सरकार देण्याचे आणि किमान समान कार्यक्रम राबवण्यास आम्ही लोकांशी बांधील आहोत. सरकार अस्थिर करण्याचा आमच्या बाजूने काही प्रश्नच नाही,” असे एच. के. पाटील म्हणाले. पटोले यांनी काँग्रेसच्या पाठीत वार केला जात असल्याचा केलेला आरोप आणि राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेनेवरील टीकेबद्दल विचारले असता पाटील म्हणाले की, “ती जुनी कथा झाली.” नेते राहुल गांधी यांचा भक्कम पाठिंबा असलेले पटोले राज्यातील ज्येष्ठ नेत्यांशी चर्चा वा विचारविनिमय न करता आक्रमकपणे आपले पत्ते खेळत आहेत. मुख्य विरोधक भाजपवर हल्ला करताना पटोले आपले सहकारी पक्ष शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसलाही सोडत नाहीत. राज्य विधानसभेच्या नुकत्याच संपलेल्या दोन दिवसांच्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक व्हावी, असे त्यांना वाटत होते; पण तसे घडले नाही.
पक्षात गट पडले
नाना पटोले यांचा काँग्रेसला पुन्हा चेतना आणण्याचा प्रयत्न असताना ते स्वत:ला पक्षाचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार म्हणून सादर करतात तसेच त्यांची राज्य सरकारमध्येही सहभागी व्हायची इच्छा आहे. पक्षातील ज्येष्ठ नेते हे महाराष्ट्रातील वस्तुस्थिती पक्ष नेतृत्वाला सांगण्यासाठी दिल्लीत येत आहेत, यातून पक्षात तीव्र गट पडले असल्याचे दिसते.