मुंबई : राज्यात एकीकडे थंडीचा मारा सुरू असून, दुसरीकडे मात्र निर्माण होत असलेले कमी दाबाचे क्षेत्र यात पावसाची भर घालत आहे. बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हवामानात उल्लेखनीय बदल होत असून, १७ नोव्हेंबरपर्यंत राज्यातील बहुतांश ठिकाणांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे मुंबईचे किमान तापमान किंचित खाली आले असले तरीदेखील कमाल तापमान ३५ अंश नोंदवण्यात येत असल्याने मुंबईकरांना घाम फुटत आहे.हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी १४, १५, १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. विदर्भात १५, १६ आणि १७ नोव्हेंबर रोजी हवामान कोरडे राहील. विदर्भात काही ठिकाणी व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. मराठवाड्यात काही ठिकाणी लक्षणीय वाढ झाली आहे. कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे.राज्यात सर्वात कमी किमान तापमान नाशिक येथे १४.२ अंश नोंद झाले असून, राज्यातील बहुतांशी शहरांतील किमान तापमानाचा पारा खाली-वर होत आहे. यात प्रामुख्याने मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील शहरांचा समावेश आहे. दुसरीकडे मुंबईचे किमान तापमान किंचित खाली आली तरी दुपारच्या कमाल तापमानाने मुंबईकरांचा जीव काढला.
मुंबईचा पारा ३५ अंशावर! राज्यात १७ नोव्हेंबरपर्यंत पावसाचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2021 6:26 AM