मुंबई : सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीला (Bullock cart racing) काही अटी आणि नियम घालून परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा धुरळा उडणार आहे. दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी स्वागत केले आहे. सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीसाठी सशर्त परवानगी दिली आहे. ही बातमी आपल्या सर्वांसाठी मोठी आनंदाची आहे, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
यासंदर्भात जयंत पाटील यांनी ट्विट केले आहे. "भिर्रर्रर्र! सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतीसाठी सशर्त परवानगी दिली आहे. ही बातमी आपल्या सर्वांसाठी मोठी आनंदाची आहे. शर्यत सुरू व्हावी ही पुणे भागातील व राज्यभरातील शेतकरी बांधवांची भावना होती. या भावनांचा मान राखत महाविकास आघाडीने सातत्याने पाठपुरावा केला", असे जयंत पाटील यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे.
याचबरोबर, खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि महाविकास आघाडीच्या माननीय खासदारांनी लोकसभेत हा प्रश्न लावून धरला. राज्यसरकारमार्फत तज्ज्ञ वकीलांची टीम लावली आणि आज हा आनंदाचा दिवस उजाडला आहे, असेही जयंत पाटील म्हणाले. तसेच, खिलारसारख्या इतर प्रजातींचेही संवर्धन व्हावे यासाठी आम्ही यापुढेही प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही देत जयंत पाटील यांनी बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणाऱ्या शेतकऱ्यांचे व त्यासाठी पाठपुरावा करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन केले आहे.
गेल्या काही वर्षांपूर्वी मुंबई हायकोर्टाने बैलगाडा शर्यतींवर बंदी घातली होती. या निर्णयाविरोधात राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, आता सुप्रीम कोर्टाने राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली आहे. बैलगाडा शर्यती आयोजित करताना नियमांचे पालन करावे लागेल. नियमांच्या चौकटीत राहून शर्यतीचे आयोजन करावे लागेल. तसेच, पशू क्रूरता प्रतिबंधक कायद्यातंर्गत नियमांचं पालन करणे बंधनकारक असणार आहे.
दरम्यान, बैलागाडा शर्यतींचे राज्यातील ग्रामीण भागात मोठे आकर्षण आहे. यासाठी ग्रामीण भागात अनेक आंदोलनेसुद्धा झाली. गावच्या यात्रांमध्ये बैलगाडा शर्यती भरवल्या जातात. मात्र बंदीमुळे यावर बंधने आली होती.