Maharashtra Minister List for Modi 3.0 NDA Government : देशात गेल्या दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या लोकसभा निवडणुकीचा ४ जूनला निकाल लागला. भाजपप्रणित एनडीए ने २९२ जागा जिंकल्या तर काँग्रेसप्रणित इंडिया आघाडीला २३२ जागा मिळाल्या. पंतप्रधान मोदी यांनी ४००पार चा नारा दिला होता. पण ते शक्य झाले नही. त्यामुळे आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजे NDA तील घटक पक्षांना सोबत घेऊन मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. आज दिल्लीतील राष्ट्रपती भवनात भव्य शपथविधी सोहळा होणार आहे. या शपथविधीसाठी विविध राज्यातील खासदारांना फोन आल्याची माहिती आहे. त्यात महाराष्ट्रातील ६ ते ७ खासदारांची नावे चर्चेत आहेत.
महाराष्ट्रातून कोण होणार मंत्री?
मोदींच्या तिसऱ्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील सहा खासदारांची नावे जवळपास निश्चित आहेत तर एका खासदाराबाबत चर्चा सुरु आहेत. भाजपाकडून महाराष्ट्रात निवडून आलेल्यांपैकी माजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पीयूष गोयल यांना पुन्हा मंत्रिपद मिळणार आहे. तर रिपाईंचे रामदास आठवले यांनाही पुन्हा राज्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय भाजपाकडून सलग तिसऱ्यांदा खासदार बनलेल्या रावेरच्या रक्षा खडसे यांना आणि पुण्यातून महापौर पदावरून थेट खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाच्या शपथेसाठी फोन आला असल्याची माहिती आहे. त्यासोबतच एकनाथ शिंदे यांनी ७ खासदार निवडून आल्यानंतर, त्यांच्यापैकी बुलढाण्याचे खासदार प्रतापराव जाधव यांना शपथविधीसाठी फोन आल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्रातील सहा खासदारांच्या व्यतिरिक्त अजित पवार गटाचे राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांचेही नाव चर्चेत आहे. परंतु त्यांना अद्याप फोन आलेला नाही, असे सांगितले जात आहे.
दरम्यान, राज्यासह देशभरातील विविध राज्यांतून आतापर्यंत अनेक नेत्यांना फोन आल्याचे सांगितले जात आहे. सूत्रांच्या हवाल्याने झी न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, फोन आलेल्या नेत्यांमध्ये राजनाथ सिंह, शिवराज सिंह चौहान, ज्योतिरादित्य, नितिन गडकरी यांच्यासह JDU नेते तथा राज्यसभा खासदार रामनाथ ठाकूर, अपना दल (एस) च्या नेत्या अनुप्रिया पटेल, लोजपा (राम विलास पासवान) अध्यक्ष चिराग पासवान, हम प्रमुख जीतन राम मांझी, रालोद प्रमुख जयंत चौधरी, टीडीपी खासदार राम नायडू, पी. चंद्रशेखर पेम्मासनी, अर्जुन राम मेघवाल, JDS चे कुमारास्वामी आदींना फोन आल्याची चर्चा आहे.