नवी दिल्ली - उत्तर प्रदेशमध्ये एक भयंकर घटना समोर आली आहे. उन्नाव (Unnao Crime News) पुन्हा एकदा हादरले आहे. उत्तर प्रदेशमधील उन्नाव जिल्ह्यामध्ये शेतात दोन मुलींचे मृतदेह आढळले असून तिसऱ्या मुलीची मृत्यूशी झुंज सुरू आहे. तीन अल्पवयीन मुली शेतात ओढणीला बांधलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. असोहा पोलीस स्टेशन परिसरातील बबुरहा या गावात ही धक्कादायक घटना घडली. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. याप्रकरणीतील एक मुलगी जिवंत असून तिच्यावर उत्तम उपचार करून तिला वाचवण्याची मागणी होऊ लागली आहे.
राज्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी देखील उन्नावमधील मुलीला मुंबईत उपचार करण्यासाठी एअरलिफ्ट करावे अशी विनंती उत्तर प्रदेश सरकारला केली आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. तसेच उन्नाव पीडितेला एअरलिफ्ट करून उत्तम उपचारासाठी मुंबईत आणण्यात यावं अशी विनंती उत्तर प्रदेश सरकारला केली आहे. "आम्ही उन्नाव पीडितेला उत्तम वैद्यकीय उपचार देऊ आणि राज्य सरकार उपचाराचा सर्व खर्च उचलेल. देशातील सर्वोत्तम रुग्णालयांपैकी काही रुग्णालये मुंबईत आहेत. हे लक्षात घेता मुलीवर मुंबई उपचार झाले तर ते अधिक योग्य होईल" असं राऊत यांनी म्हटलं आहे.
आझाद समाज पक्षाचे नेते चंद्रशेखर आझाद यांनीही या घटनेवर भाष्य केलं आहे. "उत्तर प्रदेशच्या उन्नावमधील घटना अत्यंत भयावह आहे. दोन दलित मुलींचे मृतदेह सापडले आहेत. एक जखमी आहे. मुलीला एअर अॅम्ब्युलन्सद्वारे तातडीने एम्स दिल्ली येथे आणायला हवे. आम्ही आता कोणत्याही स्थितीत हाथरसची पुनरावृत्ती होऊ देणार नाही. आमची टीम घटनास्थळी जात आहे. बहिणींच्या सुरक्षिततेशी आणि सन्मानाशी कोणतीही तडजोड करणार नाही" असं चंद्रशेखर यांनी म्हटलं आहे.
भयंकर! उन्नाव पुन्हा एकदा हादरले, शेतात आढळले 2 मुलींचे मृतदेह तर तिसरीची मृत्युशी झुंज
जंगलामध्ये संशयास्पद अवस्थेत तीन मुली आढळून आल्या. घटनेची माहिती मिळताच मुलींना लगेचच जवळच्या सार्वजनिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आलं. मात्र दोन मुलींना मृत घोषित करण्यात आलं. तर तिसऱ्या मुलीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला कानपूरच्या एका रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. तिन्ही मुली या आपल्या शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. त्याच दरम्यान हा धक्कादायक प्रकार घडल्याचं म्हटलं जात आहे. घटनेची माहिती मिळताच डीएम आणि अन्य अधिकारी जिल्हा रुग्णालयात दाखल झाले आहे. गाव आणि रुग्णालय परिसराच्या आसपास पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
"अत्यंत भयावह! योगीचं राज्य मुलींसाठी स्मशानभूमी बनलं, हे अत्याचार कधी थांबणार?"
आपचे नेते संजय सिंह यांनी देखील योगी आदित्यनाथ यांच्यावर निशाणा साधला असून टीकास्त्र सोडलं आहे. "अत्यंत भयावह... आदित्यनाथजींचं राज्य मुलींसाठी स्मशानभूमी बनलं" असं म्हणत जोरदार टीका केली आहे. आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "अत्यंत भयावह... आदित्यनाथजींचं राज्य मुलींसाठी स्मशानभूमी बनलं आहे, उन्नावची घटना मन हेलावून सोडणारी आहे. हे अत्याचार कधी थांबणार?" असं संजय सिंह यांनी म्हटलं आहे. या घटनेवरून राजकारण तापलं असून अनेकांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तसेच राज्यातील महिला सुरक्षिततेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.