मुंबई - एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देत अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतत्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. मात्र या शपथविधीला महिना उलटला तरी अजित पवार यांच्यासोबत नेमके किती आमदार आहेत, याबाबत स्पष्टता येऊ शकलेली नाही. त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या बरोबर किती आमदार आहेत, याबाबत विधानसभा अध्यक्षांनी संभ्रम दूर करावा, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
नाना पटोले याबाबत म्हणाले की, काँग्रेसला विरोधी पक्ष नेत्याचे नाव देण्यास वेळ लागला असा आरोप करण्यात येत आहे पण अजित पवार यांनी अचानक भूमिका बदलल्यामुळे तो वेळ लागला. खरे म्हणजे २०१९ पासून राज्यात राजकीय विक्रम झाले आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व अजित पवार उपमुख्यमंत्री असे सरकार झाले, ते सरकार काही तासातच बदलले व नंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आणि आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व फडणवीस आणि अजित पवार उपमुख्यमंत्री असे सरकार आले. विधिमंडळाचा इतिहासात नोंद करु नये असा हा काळ आहे. परंतु अजित पवार यांच्याबरोबर गेलेले आमदार आहेत कुठे, त्यांच्याबरोबर नक्की किती आमदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसची नक्की संख्या किती हे सभागृहात सांगावे लागणार आहे. जनतेच्या मनात संशय आहे तो दूर केला पाहिजे त्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी त्यावर निर्णय दिला पाहिजे. या सर्व गोंधळामुळे काँग्रेसला विरोधी पक्ष नेत्याचे नाव देण्यास वेळ झाला असेही पटोले म्हणाले.
गेल्या महिन्याच्या सुरुवातीला राज्याच्या राजकाणार मोठी उलथापालथ होऊन अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दाखल झाला होता. त्यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची तर इतर काही नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली होती. दरम्यान, अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार असल्याचाही दावा करण्यात येत आहे. बंडखोरीनंतर झालेल्या शक्तिप्रदर्शनावेळी ३० हून अधिक आमदार अजित पवार यांच्यासोबत उपस्थित होते. मात्र अजित पवार यांच्या गटासोबत नेमके किती आमदार आहेत हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. सध्या सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्ष दोन्ही गटांकडे किती आमदार आहेत, याची स्पष्टता करतील, असा अंदाज वर्तवला जात होता. मात्र अधिवेशन संपालया आले तरी, त्याबाबत स्पष्टता येऊ शकलेली नाही.