मुंबई – भाजपा नेते किरीट सोमय्या यांचा कथित व्हायरल व्हिडिओ प्रकरणाचे पडसाद विधिमंडळात उमटले आहेत. विधान परिषदेत ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी या संपूर्ण प्रकरणात सरकारने कुठलीही तपास यंत्रणा लावून सत्यता पडताळावी आणि या व्हिडिओतील महिला कोण याचा शोध घ्यावा अशी मागणी करत सोमय्यांवर हल्लाबोल केला.
अनिल परब म्हणाले की, मागील काळात अनेक पेनड्राईव्ह बॉम्ब सभागृहात फुटले. काल एका चॅनेलवर भाजपाच्या माजी खासदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. कुणाचीही बदनामी होता कामा नये. हा व्हिडिओ व्हायरल झालाय, कुणाच्या राजकीय आयुष्यात बदनामी काय असते? उद्ध्वस्त झाले तर तो राजकारणाचा भाग असतो. परंतु एखाद्याचे खासगी कुटुंब उद्ध्वस्त होतं त्यात आम्ही त्रस्त आहोत. जेव्हा आमच्या मुलाबाळांवर आरोप केले जातात. यंत्रणेसमोर उभे केले जाते. हा प्रश्न कुणाचा नाही तर राजकीय जीवनात काम करणाऱ्या मुलाचा आहे. कुठलाही कार्यकर्ता इथपर्यंत आलेला नाही. ज्यावेळी बदनामी केली जाते त्याची उत्तरे दिली पाहिजे. काल ज्या माजी खासदाराचा व्हिडिओ व्हायरल झाला त्याने अनेकांची आयुष्ये उद्ध्वस्त केली आहेत. त्यामुळे या व्हिडिओची सत्यता बाहेर आली पाहिजे. व्हिडिओतील महिला कोण हे समोर आले पाहिजे अशी मागणी त्यांनी सभागृहात केली.
तसेच प्रत्येक गोष्टीत गृहमंत्री एसआयटी लावता, आता या प्रकरणात काही रॉ लावायची ती लावा, गृहमंत्र्यांची राज्यात प्रतिमा आहे. अशा गोष्टी राज्यात खपवून घेणार नाही असं प्रत्येक भाषणात बोलतात त्यांच्यासमोर हा प्रसंग उभा आहे. तपास यंत्रणेतील महिलांच्या तक्रारी समोर आल्यात. हे खरे खोटे माहिती नाही. हे शोधण्याचे काम तपास यंत्रणेने केले पाहिजे. ज्यापद्धतीची ही विकृती आहे. सेक्स खंडणी मागितली जात असेल तर हा प्रकार अत्यंत गंभीर आहे. ८ तासांचे व्हिडिओ आहेत. सोमय्यांच्या पत्रात हा व्हिडिओ खोटा आहे असं कुठेही म्हटलं नाही. हा व्हिडिओ कुणी घेतला, का घेतला, खंडणीसाठी धमकी आहे का हे बाहेर आले पाहिजे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी. केंद्रीय यंत्रणेचा वापर करून गैरप्रकार झाला नाही ना असा आरोपही अनिल परब यांनी केला.
दरम्यान, अनिल परब यांनी मांडलेल्या भावनांशी मी सहमत आहे. राजकारणात अनेकदा असे प्रसंग येतात ज्यामुळे संपूर्ण आयुष्य पणाला लागते. जर विरोधी पक्षाकडे काही तक्रारी असतील तर त्या आम्हाला द्या, आम्ही सखोल चौकशी करू. महिलेची ओळख सांगता येत नाही. पोलिसांना या महिलेबाबत कळवले जाईल. सोमय्यांनीही पत्र लिहून चौकशीची मागणी केली आहे. या प्रकरणाची सखोल आणि वरिष्ठ स्तरावर चौकशी केली जाईल अशी माहिती उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.