मुंबई : महाराष्ट्र हे माझे माहेर आहे, त्यामुळेच लोकमत समूहाने ‘लोकमत महाराष्ट्रीयन युथ आयकॉन आॅफ द इयर’ या सन्मानाने केलेला माझा गौरव हा अतिशय खास आहे, अशी भावना धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या संस्थापिका नीता अंबानी यांनी व्यक्त केली. शिक्षण, क्रीडा तसेच ‘भारत-इंडिया जोडो’सारख्या उपक्रमाद्वारे ग्रामविकासाला नवा आयाम देणाऱ्या नीता अंबानी यांना ‘लोकमत महाराष्ट्रीयन युथ आयकॉन आॅफ द इयर’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्या म्हणाल्या, यानिमित्ताने काही गोष्टी शेअर कराव्याशा वाटतात. शिक्षण, क्रीडा, सामाजिक अशा काही क्षेत्रांत गेली अनेक वर्षे मी सक्रिय आहे. या क्षेत्रांतील घडामोडी मी जवळून अनुभवते आहे. त्याबद्दल थोडा अनुभव शेअर करायचा आहे. शिक्षण क्षेत्रात काम करायला सुरुवात केल्यानंतर माझा पिंड शिक्षकाचाच असल्याचे मला प्रकर्षाने जाणवले. शिक्षण हा माझ्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलच्या माध्यमातून शिक्षण विषयात फार जवळून काम करता येते. समाजाच्या विविध स्तरातील मुलं आमच्या शाळेत शिकतात आणि शिक्षणासोबतच त्यांच्या आवडींना कौशल्याचे कोंदण देण्याचा आम्ही प्रयत्न करतो. आज हजारो मुले या शाळेतून शिक्षण पूर्ण करून बाहेर पडली आहेत आणि विविध क्षेत्रांत आपले कर्तृत्व सिद्ध करत आहेत. मला असे वाटते की आमच्या याच अनोख्या प्रयत्नांमुळे अल्पावधीत आमच्या शाळेने देशातील पहिल्या क्रमांकाची शाळा म्हणून लौकिक प्राप्त झाला आहे. क्रीडा हा आणखी एक घटक, ज्यामध्ये मी अतिशय समरसून सक्रिय आहे. दोन वेळा मुंबईच्या शिरपेचात विजयाचा तुरा रोवणाऱ्या मुंबई इंडियन्स या आयपीएलच्या टीमच्या माध्यमातून क्रिकेट या खेळात तर सक्रिय आहेच; पण याचसोबत जगात सर्वाधिक लोकप्रिय व चर्चित असलेल्या फुटबॉल या क्रीडा प्रकारातही आम्ही सक्रिय आहोत. याखेरीज ‘भारत-इंडिया जोडो’ या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहोत. मला यानिमित्ताने धीरूभाई यांचे तरुणांबद्दलचे विचार आठवतात, ते म्हणायचे की, तरुणांना उत्तम सेवा-सुविधा द्या, एक उत्तम वातावरण त्यांच्याभोवती निर्माण करा. त्यांना प्रोत्साहित करा. त्यांना हवे असलेले सहकार्य, सुविधा उपलब्ध करून द्या. हे तरुण म्हणजे ऊर्जेचा एक अमर्याद स्रोत आहेत.
महाराष्ट्र माझे माहेर ! - नीता अंबानी
By admin | Published: April 04, 2016 3:30 AM