मुंबईः उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राच्या २९व्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता बाकीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हा होणार याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. उद्धव ठाकरेंबरोबर सहा मंत्र्यांनी शपथ घेतली असली तरी विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद मिळवण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये चुरस असल्याचं समोर आलं आहे. विधानसभा अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे देण्यास काँग्रेस तयार असली तरी त्यांना त्या बदल्यात उपमुख्यमंत्रिपद हवे आहे. पण राष्ट्रवादीला विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद दोन्ही हवी असल्याची चर्चा आहे. महाराष्ट्र विकास आघाडीमधल्या अध्यक्षपद व उपमुख्यमंत्रिपदाचा तिढा अद्याप सुटलेला नसून काँग्रेसने मात्र दोन उपमुख्यमंत्री करावे, विधानसभेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीने घ्यावे, असा तोडगा सुचवला आहे.
त्याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांनी उपमुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच होणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. उपमुख्यमंत्रिपद काँग्रेसला सोडण्याबाबत कोणतीही चर्चा नाही. तिन्ही पक्षांच्या बैठकीत जबाबदारी देत असताना अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्या(काँग्रेस)कडे द्यायची आणि उपाध्यक्षपदाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे द्यायची, असं ठरलं आहे. तर मुख्यमंत्र्यांची जबाबदारी शिवसेनेकडे द्यायची आणि उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी राष्ट्रवादीकडे द्यायची, असं निश्चित झालेलं आहे. तिन्ही पक्षाच्या वरिष्ठांनी जी काही नाव ठरवलेली होती, त्यांनी काल शपथ घेतली. बाकीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करायचा हा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री महोदयांचा आहे, असं म्हणत अजित पवारांनी सूचक इशारा दिला आहे. महाविकास आघाडीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत एकच उपमुख्यमंत्रिपद असेल व विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे असेल, असा निर्णय झाल्याचे राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी सांगितले होते. गुरुवारी दिवसभरात बऱ्याच घडामोडी झाल्या. काँग्रेसने अध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव निश्चित केले होते. परंतु त्या नावाला राष्ट्रवादीनं विरोध केल्याचीही चर्चा आहे. शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह १६ तर राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रिपदासह १५ मंत्रिपदे मिळतील आणि काँग्रेसला १२ मंत्रिपदे असे ठरले तिन्ही पक्षांचं ठरलं होतं. पण आता काँग्रेसला १३ मंत्रिपदे हवी आहेत, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद आणि उपमुख्यमंत्रिपद कोणाला मिळतं हे येत्या काळात समजणार आहे.