विजय बाविस्कर पुणे : माझ्या मराठीला मानाचे स्थान मिळावे म्हणून आम्ही दिल्ली दरबारी किती भिका मागायच्या? मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा, यासाठी वर्षानुवर्षे पाठपुरावा करावा लागणे, हाच महाराष्ट्राचा अपमान आहे. महाराष्ट्र लाचार नाही, असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले. मराठी भाषा दिनानिमित्त ‘लोकमत’ला दिलेल्या खास मुलाखतीत राज ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत होत असलेल्या दिरंगाईबद्दल अनेक मुद्दे उपस्थित केले. राज म्हणाले, ‘‘दिल्लीचा महाराष्ट्राकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे, तो आपल्याला अभिजातच्या प्रश्नावरून दिसतो. सोन्याचे अंडे देणारी कोंबडी याच दृष्टिकोनातून महाराष्ट्राकडे बघितले जाते.
मराठी माणूस बेसावध, आपला शत्रू ओळखामहाराष्ट्राच्या बलस्थानांची आम्हाला जाणीवच नाही. जातीचा विचार करणाºया प्रत्येक माणसाला माझे आवाहन आहे, की बाहेरच्या प्रांतातून येणारा कोणताही माणूस हा तुमच्याकडे ब्राह्मण, मराठा, माळी, बौद्ध म्हणून पाहत नाही तर मराठी म्हणून बघतोय. मला काम मिळाले पाहिजे, एवढेच तो बघतो. आम्हाला आमचा शत्रूच कळला नाही. देवगिरीचा आमचा राजा रामदेवराय यादव जसा बेसावध होता, तसा आजचा मराठी माणूस आहे. शेवटी अल्लाउद्दीन खिलजी येऊन आमच्या महाराष्ट्राची राजकन्या घेऊन गेला. आमचे डोळे उघडणारच नाहीत का?
‘शिवाजी’ हा विचार आत्मसात केला तरी महाराष्ट्र टिकेलदिल्लीतील सत्ताधारी नेहमी महाराष्ट्राचा दुस्वास का करतात, या प्रश्नावर ते म्हणाले, खूप काळ मराठी नेतृत्वाने देश गाजविला. अटकेपार झेंडे फडकावले. दिल्लीच्या गादीवर राज्यकर्त्यांची नेमणूक पेशव्यांनी केली. औरंगजेब आग्रा सोडून २७ वर्षे महाराष्ट्रात राहायला आला. तो १६८१मध्ये आला; पण १६८० मध्येच महाराजांचे निधन झाले होते. औरंगजेबाच्या काही पत्रांमध्ये संदर्भ आढळले आहेत, की तो म्हणतो, ‘‘शिवाजी अजून मला छळतोय.’’ छत्रपती संभाजीमहाराज, राजाराममहाराज, ताराराणीसाहेब, संताजी-धनाजी हे सगळे जे लढत होते याला तो शिवाजी म्हणतो. कारण, या सगळ्यांची लढण्याची जी प्रेरणा होती, त्याला तो ‘शिवाजी’ म्हणतोय. तो ‘शिवाजी’ नावाचा विचार मारायला आला होता. तो ‘शिवाजी’ नावाचा विचार प्रत्येक मराठी माणसाने आत्मसात केला, तरी महाराष्ट्राला परत कधी धोका उरणार नाही.
मला राष्ट्रीय नेता होण्याची स्वप्ने पडत नाहीत!मराठीच्या प्रश्नावर संघर्ष करताना कोणी मला खलनायक ठरविले तरी फरक पडत नाही, असे सांगताना राज ठाकरे म्हणाले, ‘‘माझा देशाकडे पाहण्याचा दृष्टिकोन एवढेच सांगतो, की प्रत्येकाने आपापले राज्य मोठे करावे. राज्य मोठे झाले, की देश मोठा होतो. पण, एकेका राज्याने दुसरे राज्य खाऊन टाकायचा विचार केला, तर देश कधी मोठा होणार नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष मी महाराष्ट्र मोठा करण्यास काढला आहे. माझा फोकस महाराष्ट्र आहे. मला राष्ट्रीय नेता होण्याची स्वप्ने कधी पडत नाहीत.
माझाच विचार अमेरिकेतही!उत्तर प्रदेशातून हरिवंशराय बच्चन, मुन्शी प्रेमचंद येणार असतील तर राज ठाकरे लाल कार्पेट टाकायला तयार आहे. तेथून अटलबिहारी वाजपेयी महाराष्ट्रात येणार असतील, तर मला सर्वाधिक आनंद होईल. पण, आझमगढवरून उत्तर प्रदेशचे गुंड येणार असतील तर मी का गप्प बसू? मला अबू आझमी चालणार नाही. ट्रम्प काय बोलले? हेच तर बोलले. ‘अमेरिका फर्स्ट.’ पण आमच्या लोकांना समजले नाही.
राजभाषा दिन कुसुमाग्रज डे होऊ नयेमदर्स डे, फादर्स डे याच्यासारखा मराठी भाषा दिन साजरा होतो. शिवजयंती म्हणजे आपल्या राजाचा जन्मदिवस आहे. तो ३६५ दिवस साजरा व्हायला पाहिजे. तसे मराठीचे पाहिजे. कुसुमाग्रजांच्या जन्मदिनी हा मराठी भाषा दिन साजरा होतोय, याचा आनंद आहे. कुसुमाग्रजांनी काय लिहून ठेवलेय, हे आम्ही आत्मसात करणार नाही; पण कुसुमाग्रज डे साजरा करणार!’’
मराठी शाळांबाबत धोरणच नाही-इंग्रजी भाषा तुम्हाला आली पाहिजे. त्यामध्ये दुमत असण्याचे कारण नाही; पण त्यासाठी मराठी बंद करावी, असा अर्थ होत नाही. तुम्ही सेमी इंग्लिश स्कूल करू शकता. मराठी भाषेबरोबर इंग्रजीचेही दिवसातील तास वाढविले, तर मुलांना तेथे इंग्रजीही शिकता येईल; पण आपल्या लोकांना यातून मार्गच काढायचा नाही. तो काढायचा नसल्याने या सगळ्या गोष्टी घडतात. शाळा जगवायच्या असतील, टिकवायच्या असतील तर त्याला अनेक मार्ग आहेत. सरकार काही मार्गच हाताळत नाही. आपण एखादी गोष्ट तरी ‘टेस्ट केस’ म्हणून करून पाहायला पाहिजे; पण तसे होताना कोठेच दिसत नाही.