विरोधकांच्या डोक्यात फक्त कबर आणि कामराच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2025 07:37 IST2025-03-27T07:36:42+5:302025-03-27T07:37:10+5:30
"विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी त्यांना आम्ही पूर्ण वाव दिला"

विरोधकांच्या डोक्यात फक्त कबर आणि कामराच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निशाणा
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : अधिवेशनात रोज सहा तास काम केले पाहिजे, पण आम्ही रोज नऊ तास काम केले. शेतकरी, कामगार, अर्थसंकल्पावर सभागृहात चर्चा झाली. पण विरोधकांच्या डोक्यात कबर आणि कामराच असेल तर आम्ही काय करणार, त्यांच्या डोक्यात तेवढेच जाते, आमच्यासाठी कबर आणि कामरापेक्षा राज्यातील १३ कोटी लोक महत्त्वाचे आहेत, त्यांच्यासाठी आम्ही निर्णय घेतले, असे प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी केलेल्या टीकेला दिले. अधिवेशनेच्या सांगतेनंतर विधानभवनात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.
विरोधी पक्ष संख्येने कमी असला तरी त्यांना आम्ही पूर्ण वाव दिला, त्यांचे ऐकून घेतले त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. राज्याच्या विकासाकरता अनेक धोरणे असलेला अर्थसंकल्प संमत केला असल्याने राज्याच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले,
सर्व योजना, प्रकल्प, कल्याणकारी योजना सुरू ठेवून कुठेही अर्थव्यवस्था बिघडू दिली नाही, विरोधकांना चिंता होती आता सगळ्या योजना बंद होणार, प्रकल्प बंद होणार, पण महायुती सरकारची ही इनिंग धडाक्यात सुरू झाली आहे. विकासाचा वेग कमी न करता आम्ही कामाला प्राधान्य दिले आहे. विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन करण्यात धन्यता मानली, सभागृहात येऊन त्यांनी चर्चा करायला हवी.
'जिसने रिझन दिया उसका सिझन खतम हो गया...'
आता घटनाबाह्य सरकार नाही, २३५ चे सरकार आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी, 'नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, जिसने रिझन दिया उसका सिझन खतम हो गया', असा टोला विरोधकांना लगावला.
निकषात बसणाऱ्या लक्षवेधी चर्चेला याव्यात
लक्षवेधी वाढल्या तरी हरकती नाही, पण निकषात बसणाऱ्या लक्षवेधी चर्चेला याव्यात, निकषाच्या बाहेरच्या येऊ नये, अशी विनंती आम्ही अध्यक्षांना करणार आहोत, असे फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
विरोधी पक्ष निवडीचा अधिकार अध्यक्षांना
विरोधी पक्षनेता निवड कधी होणार असा प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, विरोधी पक्षनेता निवडीचा अधिकार विधानसभा अध्यक्षांना आहे. नियमानुसार विधानसभा अध्यक्ष 3 योग्य तो निर्णय घेतील, असेही फडणवीस म्हणाले.