मुंबई : मनसेने रविवारी बांगलादेशी आणि पाकिस्तानी घुसखोरांविरोधात महामोर्चा काढून मुंबईत जोरदार शक्तिप्रदर्शन केले आहे. त्या पार्श्वभूमीवर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मनसेला टोला लगावला आहे. गर्दीचे रुपांतर मतात होत नसल्याचे महाराष्ट्राच्या जनतेने आधीच दाखवून दिले असल्याचे, सामंत यांनी म्हटले आहे.
मनसेच्या महामोर्चामुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू सरकली असल्याची टीका मनसेच्या नेत्यांकडून करण्यात आली होती. त्याला उत्तर देताना सामंत म्हणाले की, मनसेने काही दिवसांपूर्वी त्यांचा झेंडा बदलला, विचारधारा बदलली आणि त्यांच्यानंतर त्यांचा काढलेला हा पहिला मोर्चा आहे. हा मोर्चा चांगला झाला की वाईट हे आपल्याला निवडणुकीनंतर कळणार आहे.
तर या मोर्च्याचे रुपांतर जर मतांमध्ये झाले तरच या मोर्च्याला काही अर्थ आहे. मात्र या पक्षांची पार्श्वभूमी पाहता त्यांच्या नेत्यांच्या सभेला आणि भाषणांना गर्दी होते, पण त्याचे रुपांतर मतांमध्ये होत नाही हे महाराष्ट्राच्या जनतेने अनेकवेळा दाखवून दिले असल्याचा टोला त्यांनी मनसेला लगावला. तसेच हा मोर्चा मनसेने स्वता: काढला आहे की त्यांना भाजपने काढायला सांगितला आहे, हे मला सांगता येणार नाही.परंतु या मोर्च्यामुळे शिवसेनेला काहीच फरक पडणार नसल्याचे सुद्धा सामंत म्हणाले.