मुंबई-
राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारनं महाराष्ट्र पोलिसांना गणेशोत्सवाचं मोठं गिफ्ट दिलं आहे. आता कॉन्स्टेबल रँकच्या कर्मचाऱ्यांना खात्याअंतर्गतच २० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज मिळवता येणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची माहिती दिली आहे. याआधी ठाकरे सरकारनं ही योजना बंद केली होती. फडणवीसांनी मात्र ती पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे राज्यातील पोलीस दलासाठी मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे.
डीजी लोन खात्यासाठी जितका निधी आवश्यक होता तो निधी उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. त्यामुळे राज्यातील पोलिसांना आता २० लाख रुपयांपर्यंतचं कर्ज खात्याअंतर्गतच मिळवता येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याआधीच पोलिसांना १५ लाख रुपयांत मुंबईत घर उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता खात्यांतर्गत कर्जाची सुविधा पोलिसांना उपलब्ध झाल्यानं पोलीस दलाला मोठा दिलासा मिळाला आहे.
डीजी लोन योजनेनुसार कॉन्स्टेबलपर्यंतच्या कर्मचाऱ्यांना खात्यामार्फतच सहज २० लाखांपर्यंतचं कर्ज उपलब्ध केलं जातं. ठाकरे सरकारडून ही योजना थांबवण्यात आली होती. पण फडणवीसांनी गृहमंत्रीपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर या खात्यासाठीचा आवश्यक निधी मंजूर केल्यानं योजना पुन्हा सुरू झाली आहे.
बीडीडी चाळीतील पोलीस कुटुंबीयांना १५ लाखात घरबीडीडी चाळ पुनर्विकासात पोलीस कुटुंबीयांना स्वस्तात घर उपलब्ध करुन देण्याचा निर्णय ठाकरे सरकारनं केला होता. ठाकरे सरकारनं ५० लाखात घर उपलब्ध करुन देण्याची घोषणा केली होती. मात्र ५० लाख रुपये हे परवडणारे नाहीत अशी प्रतिक्रिया बीडीडी चाळीत राहणाऱ्या पोलीस आणि त्यांचे कुटुंबीयांनी दिली होती. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या पावसाळी अधिवेशनात बीडीडी पुनर्विकास प्रकल्पातील पोलीस कुटुंबीयांना ५० ऐवजी १५ लाखांत घर उपलब्ध करुन दिलं जाईल अशी मोठी घोषणा केली. याबाबतचा शासन निर्णय देखील आता जारी करण्यात आला आहे.