जयंत कुलकर्णी,
औरंगाबाद- प्रचंड इच्छाशक्ती आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत औरंगाबादचा पोलीस नाईक शेख रफीक याने गुरुवारी सकाळी ११ वाजता जगातील सर्वोच्च शिखर एव्हरेस्टवर मराठवाड्याचा झेंडा फडकावला. असा पराक्रम करणारा शेख रफीक मराठवाडा आणि महाराष्ट्र पोलीस दलातील पहिला गिर्यारोहक ठरला.औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलात २००६ साली भरती झालेल्या रफीकने याआधी हिमालयातील आठ उंच शिखरे सर केली आहेत. यानंतर त्याने एव्हरेस्टचा (उंची ८८४८ मीटर) ध्यास घेतला. रफीकने दोनदा एव्हरेस्ट शिखराला गवसणी घालण्याचा प्रयत्न केला होता; परंतु नैसर्गिक आपत्तीमुळे त्याला यश आले नव्हते. गिर्यारोहणाचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेला रफीक पुन्हा एकदा या मोहिमेसाठी ४ एप्रिल रोजी रवाना झाला होता. एक महिना १५ दिवस... एवढ्या प्रवासानंतर गुरुवारी सकाळी ११ वाजता रफीकने ही मोहीम फत्ते केली.सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रफीकला या मोहिमेसाठी लागणारा अवाढव्य पैसा उभा करणे मोठेच आव्हान होते. एव्हरेस्ट मोहिमेसाठी कमीत कमी २५ लाख रुपये खर्च येतो. सलग दोन वर्षे मोहीम अयशस्वी झाल्यामुळे आपल्याला मदत केली त्यांना काय वाटेल, असा प्रश्न त्यास पडत असे. त्याने पोलिसांच्या सोसायटीतून तसेच वैयक्तिक कर्जही काढले. शिवाय त्याची जिद्द पाहून मदतीसाठी पोलीस दलातील अनेक अधिकारी, कर्मचारी तसेच शहरातील उद्योजक, महाविद्यालयीन प्राध्यापक आणि मित्रपरिवारातील अनेकांचे हात पुढे आले.
एव्हरेस्ट सर करण्याचे टप्पेएव्हरेस्ट सर करताना विविध टप्पे पार करावे लागतात. त्यात प्रथम बेस कॅम्पला वातावरणाशी जुळवून घेता यावे यासाठी थांबावे लागते. त्यानंतर प्रत्यक्ष एव्हरेस्ट चढाई करताना कुम्बू आइसफॉल, कॅम्प १, कॅम्प २, कॅम्प ३, कॅम्प ४, हिलरे स्टेप, समीट कॅम्प आणि समीट असा एव्हरेस्टचा मार्गक्रमण असतो. विशेष म्हणजे कुम्बू आइसफॉलवर चढाई करताना बर्फाचा पहाड अंगावर आदळण्याची शक्यता असते. एव्हरेस्ट सर करताना हा मार्ग सर्वात खडतर असल्याचे रफीकचे मार्गदर्शक सुरेंद्र शेळके यांनी सांगितले.सुरेंद्र चव्हाण पहिला महाराष्ट्रीय एव्हरेस्ट वीरमहाराष्ट्रातर्फे १९९८ साली पुणे येथील सुरेंद्र चव्हाण याने एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम केला होता. त्याने चीनच्या मार्गाने हे सर्वोच्च शिखर सर केले होते. त्यानंतर नेपाळ भागाकडून एव्हरेस्ट सर करणारा महाराष्ट्राचा पहिला एव्हरेस्ट वीर म्हणून २0१२ साली श्रीहरी तापकीर यांनी मान मिळवला होता. याच वर्षी आनंद बनसोडे, सागर पालकर यांनी, तर २0१३ मध्ये किशोर धानकुडे यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा बहुमान मिळवला होता.कृष्णा पाटील पहिली महिला गिर्यारोहकमहाराष्ट्राच्या कृष्णा पाटील हिने २00९मध्ये सर्वात कमी वयात एव्हरेस्ट सर करण्याचा पराक्रम केला होता. कमी वयात एव्हरेस्ट सर करणारी पुणे येथील कृष्णा पाटील ही पहिली भारतीय ठरली. त्यानंतर २0११ मध्ये सांगलीच्या प्रियंका मोहितेनेही एव्हरेस्ट सर केले होते.>अभिनंदन रफीक !औरंगाबाद ग्रामीणमधील पोलीस नाईक शेख रफीक याने आपल्या जिद्दीच्या जोरावर एव्हरेस्ट शिखर सर केले आणि शहरासोबतच महाराष्ट्र पोलिसांच्या इतिहासात आपले नाव सुवर्ण अक्षरांनी नोंदविले. या आनंदाच्या क्षणी रफीकचे आई-वडील, नातेवाईकांसोबतच त्याला प्रत्येक क्षणी साथ आणि हिंमत देणाऱ्या सर्वांचे मनापासून मी अभिनंदन करतो. अभिनंदन रफीक.- राजेंद्र दर्डा, एडिटर इन चीफ, लोकमत समूह>४/०४/१६ एव्हरेस्ट मोहिमेसाठी मुंबईला रवाना५/०४/१६काठमांडू येथे पोहोचला. काठमांडू येथे पूर्वतयारीनंतर तो ९२00 फूट उंचीवर असलेल्या लुकला येथे पोहोचला.१५/०५/१६बेसिक कॅम्पवर तयारी करून वेदर चांगले पाहून त्याने एव्हरेस्ट शिखर सर करण्यास प्रत्यक्ष सुरुवात केली.१५/०५/१६कॅम्प २वर पोहचला. १७/०५/१६कॅम्प तीनवरून चढाईला सुरुवात केली. १७/०५/१६चौथ्या कॅम्पवर हवामान खराब असल्यामुळे त्याला थोडी विश्रांती घ्यावी लागली. त्याला ७ वाजता सुरुवात करायला हवी होती; परंतु खराब हवामानामुळे रात्री १0 वाजता कॅम्प ४ वर रफिकने चढाईस सुरुवात केली.१९/०५/१६सकाळी ११ च्या सुमारास रफिकने एव्हरेस्टवर तिरंगा आणि महाराष्ट्र पोलीसचा ध्वज फडकावला.