प्रशांत ननवरे- बारामती : 'कोरोनाच्या लॉकडाऊन' मुळे अनेकांची कधीही न भरुन येणारी हानी झाली आहे. अशाच लॉकडाऊनमध्ये घडलेल्या एक दुर्दैैवी घटनेने खाकीतील माणुसकी अधोरेखित केली आहे. नाशिकला देवदर्शनाला निघालेल्या तामिळनाडुच्या आजोबांनी प्रवासातच शेवटचा श्वास घेतला.मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांच्या नातुला आजोबांचे पार्थिव देखील महाराष्ट्रातुन तामिळनाडुला नेता आले नाही.शेवटी नातुच्या विनंतीवरुन पोलिसांनीच पणतुवर अंत्यसंस्कार केले. या नातुने कठीण प्रसंगात पोलिसांनी केलेली मदत एका पत्राद्वारे ‘शेअर’ केली आहे.
अरुण मुथाई असे या नातवाचे नाव आहे. अरुण हा चेन्नई, तामिळनाडूचा रहिवासी आहे. त्याचे पणजोबा शिवा स्वामीगल हे शंकराचे भक्त असल्याने नाशिकला देवदर्शनासाठी आले होते. तिथुन माघारी येताना ते पुण्यात कुठेतरी अडकले. त्यांनी अरुण आणि त्याच्या कुटुंबियांना कॉल केला आणि मदत पाहिजे म्हणून सांगितले.मात्र, त्यांचा फोन ‘ डिस्कनेक्ट’ झाला. त्यावर अरुण ने त्यांनापुन्हा फोन लावायचा प्रयत्न केला. पण फोनवर संपर्क होवु शकला नाही. शेवटी अरुण आणि त्याच्या कुटुंबियांनी महाराष्ट्र पोलीसच्या वेबसाईटवर तक्रार दिली. त्यानंतर त्यांना महाराष्ट्र पोलिसांचा फोन आला , पणजोबांना पोलिसांनी हॉस्पिटलमध्ये अॅडमिट केले होते. पण उपचार चालू असताना त्यांचा मृत्यू झाला . अरुण आणि त्याच्या कुटुंबियांना पणजोबांच्या मृत्यूची बातमी ऐकून खूप वाईट वाटले.या दरम्यान अरुणला पोलिसांनी येऊन पणजोेबांचे पार्थिव घेवून जाण्यास सांगितले. पण लॉकडाउनमुळे त्यांना एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जात येत नव्हते. पणजोबांवर अखेरच्या क्षणी अंत्यसंस्कार करता येणार नसल्याने त्यांचे कुटुंब दु:खी झाले.मात्र, कठीण प्रसंगातुन सावरत त्यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या परीस्थितीचे भान राखत पोलिसांनाच त्यांच्या पणजोबांचे अंत्यविधी उरकण्यास सांगितले.त्यासाठी आवश्यक ना हरकत प्रमाणपत्र, आवश्यक ती सर्व कागदपत्र पोलिसांनी पाठविली. त्यांनी देखील परिस्थिती समजून घेऊन सर्वोतोपरी मदत केली. आता सर्व संपलेले आहे. आम्ही त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो,अशा शब्दांत अरुण याने पत्र पाठवुन पोलिसांच्या कधीही न संपणाºया ऋणातुन उतराई होण्याचा प्रयत्न केला.
कोरोनाला लढा देण्यासाठी डॉक्टर आणि पोलीस २४ तास लढत आहेत.या दोघांनीपार पाडलेल्या प्रामाणिक कर्तव्याचे सर्वांनाच कौतुक आहे. खाकीतील सामाजिक भान,माणुसकी पाहुन गहिवरलेल्या नातवाने आभारपत्र पाठवुन पोलिसांशी भावनिक नाते जोडले.त्यामुळे कोरोना सारख्या कठीण परीस्थितीत पोलिसांनी दाखविलेली खाकीतील माणुसकी अधोरेखित झाली आहे.भिगवणचे पोलीस निरीक्षक जीवन माने, मुंबई मालवणी पोलीस स्टेशनचे निवृत्त पोलीस निरीक्षक लक्ष्मण शिंदे,भिवंडी पोलीस निरीक्षक मनिष पाटील यांच्यासह बारामती शहर पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांनी मोलाची मदत केल्याचे अरुण यांनी पाठविलेल्या पत्रात नमुद करण्यात आले आहे.———————————.... महाराष्ट्र पोलीस आमच्या कुटुंबासाठी देव... भिगवण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जीवन माने यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की, २५ मार्च रोजी भिगवण रेल्वे स्टेशनवर एक वृद्ध बेशुद्ध पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने त्या ठिकाणी धावघेत त्यांना भिगवण येथे उपचारासाठी आणले. मात्र, प्रभावी उपचारासाठी भिगवणमधून त्यांना बारामतीच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना रविवारी (दि.५) त्यांचे निधन झाले. पोलिसांनी त्यांचे छायाचित्र आणि वर्णन सोशल मीडियावर, पोलीस प्रशासनामध्ये राज्यात सर्वत्र पाठविले. त्यावर भिवंडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मनिष पाटील यांनी या वर्णनांशी मिळती जुळती तक्रार ऑनलाईन दाखल झाल्याचे सांगितले. त्यावर खात्री करून अरूण मुथाई यांना मी स्वत: संपर्क साधला. त्यांचे कुटुंबिय त्यानंतर इकडे येण्यासाठी निघाले होते. मात्र, कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे तामिळनाडू पोलिसांनी त्यांना या ठिकाणी येऊ दिले नाही. त्यामुळे हतबल झालेल्या अरुण यांनी आम्हाला मेल पाठवून पोलिसांनीच अंत्यसंस्कार करण्याची विनंती केली. त्यासाठी ना हरकत प्रमाणपत्र देखील शासकीय मेलवर पाठविली.
त्यानंतर पोलिसांनी तेथील त्यांच्या सामाजिक रितीरिवाजानुसार,सोमवारी (दि. ६) बारामती येथील कºहा नदीच्या काठावर अंत्यसंस्कार केले.अरुण यांनी सांगितलेले रितीरिवाज पूर्ण करण्याची काळजी पोलिसांनी घेतली.त्यासाठी पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील, बारामती नगरपरिषदेचे मुख्याधिकारीयोगेश कडुसकर, आरोग्य निरीक्षक सुभाष नारखेडे यांची मदत झाली. त्या आजोबांकडे मृत्युसमयी १ लाख ३५ हजार १०० रुपयांची रोकड होती.पोलिसांच्या ताब्यात ही रक्कम आहे. लवकरच ती रक्कम त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहे. त्यानंतर ती रक्कम कोरोना मदतनिधीसाठी देण्याचा मानस त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.अंत्यसंस्कारानंतर अरुण यांनी महाराष्ट्र पोलीस म्हणजे आमच्या कुटुंबासाठी देव म्हणून धावून असल्याचे सांगत अश्रुंना वाट मोकळी करून दिल्याचे पोलीस निरीक्षक माने यांनी आवर्जुन सांगितले.