मुंबई: प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दलातील शौर्य, गुणवत्तापूर्ण सेवा आणि उल्लेखनीय सेवेबद्दल देण्यात येणाऱ्या राष्ट्रपती पदकांची सोमवारी घोषणा करण्यात आली. महाराष्ट्रात पोलीस सेवेतील एकूण ५१ पोलिसांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. यातील चार पोलीस अधिकाऱ्यांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक’ पुरस्कार, ७ ‘पोलीस शौर्य पदक’ पुरस्कार तर ४० 'पोलीस पदक' पुरस्कार हे प्रशंसनीय सेवेकरिता जाहीर झाले. महाराष्ट्रातील पोलीस सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना बहुमान प्राप्त झाल्याबद्दल राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी साऱ्यांचे कौतुक केले. राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेत पोलीस दलाची जबाबदारी अतिशय महत्त्वाची असते, त्यामुळेच या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन, अशी प्रतिक्रिया अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.
"राज्याच्या सुरक्षा व्यवस्थेत पोलीस दलाचे योगदान अतिशय महत्वपूर्ण आहे. आपल्या कार्याचा विशेष ठसा उमटविलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना सन्मान राष्ट्रपती पदकाद्वारे करण्यात येतो. हा त्यांच्या कामाचा सर्वोच्च बहुमान असून पुरस्काराने त्यांच्या खांद्यावर अधिक जबाबदारी येते. त्यामुळे पोलिसांची जबाबदारी ही अतिशय महत्त्वाची असून त्यांचा झालेल्या सन्मानामुळे राज्याची मान गौरवाने अधिक उंचावली गेली आहे", अशा भावना मंत्री भुजबळ यांनी मांडल्या.
"महाराष्ट्रातील सात जणांना शौर्य पदक, चार जणांना उल्लेखनीय सेवा तर ४० अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल हा बहुमान प्राप्त झाला आहे. यामध्ये नाशिक शहर पोलिस दलातील उपनिरीक्षक संजय अण्णाजी कुलकर्णी यांना गुणवत्तापूर्ण सेवेबद्दल राष्ट्रपती पोलिस पदकाचा सन्मान प्राप्त झाला आहे. या सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांचे मी अभिनंदन करतो. तसेच, या सर्व पोलीस सेवेतील कर्मचारी, अधिकाऱ्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देतो", असेही भुजबळ म्हणाले.