नितीन गव्हाळे/ अकोला : गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारे पोलीसच गुन्हय़ांमध्ये गुंतले असल्याची धक्कादायक बाब नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोच्या(एनसीआरबी) अहवालातून समोर आली आहे. गतवर्षात महाराष्ट्रातील पोलिसांविरुद्ध ६ हजार ५२८ तक्रारी करण्यात आल्या असून, विविध कलमांतर्गत ४८७ पोलिसांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. विशेष म्हणजे देशात सर्वाधिक गुन्हे महाराष्ट्रातील पोलिसांवर नोंदविल्या गेले आहेत. एनसीआरबीच्या अहवालानुसार पोलिसांविरुद्ध २0१४ मध्ये मानवी अधिकारांचे हनन, कौटुंबिक वाद, विवाहितेचा छळ, मारहाण, लैंगिक शोषण आदी प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदविले गेले आहेत. देशभरात पोलिसांविरुद्ध एकूण ४७ हजार ७७४ तक्रारी करण्यात आल्या. त्यात २ हजार ६0१ पोलिसांविरुद्ध देशभरात विविध ठिकाणी गुन्हे नोंदविले गेले.
राज्यनिहाय पोलिसांविरुद्ध तक्रारींची आकडेवारी
राज्य एकूण तक्रारी विभागीय चौकशी न्यायदंडाधिकारी न्यायालयीन दाखल गुन्हे
महाराष्ट्र ६५२८ ७२७ 0८ ६0 ४८७
गुजरात ११४४ ७८२ 0३ ३५ ४१७
दिल्ली ११९0२ ५४0 00 00 १७३
मध्य प्रदेश १0८८७ १७६४ 0९ 0९ १७२
उत्तर प्रदेश १८४८ १८0५ 0४ 0२ १७0
राजस्थान २८८१ ५४१ १४ 0८ १६७
केरळ १00३ ८२९ 0२ १७ १४0
आंध्र प्रदेश १८९ ७९ 00 ३२ १२८
तामिळनाडू १३८ ५0 १0 ५७ १२६
पंजाब २0३६ ५४१ १४ 0८ ११५
*राज्यातील ३८६ पोलिसांना अटक
महाराष्ट्रातील पोलिसांविरुद्धच्या ६५२८ तक्रारींची चौकशी झाली. त्यात २३५५ तक्रारी खोट्या असल्याचे दिसून आले. गुन्हे दाखल झालेल्या १६७ पोलिसांसंबंधी आणि वैयक्तीकरीत्या १८६ दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले. ३८६ पोलिसांना अटक करण्यात आली. देशभरातील पोलिसांविरुद्ध दाखल झालेल्या ४७,७७४ तक्रारींपैकी १९,८८७ तक्रारी खोट्या असल्याचे प्राथमिक चौकशीत स्पष्ट झाले. गुन्हे दाखल झालेल्या १२६८ पोलिसांसंबधी आणि वैयक्तीकरीत्या ११६६ दोषारोपपत्र न्यायालयात दाखल झाले. देशभरातील १४८२ पोलिसांना विविध कलमांतर्गत अटक करण्यात आली.