Sanjay Raut on BJP Dhanyawad Yatra : लोकसभा निवडणुकीत भाजपचा मोठा पराभव झाला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत २३ जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी २८ जागा लढवून केवळ ९ जागा मिळाल्या. या पराभवाची जबाबदारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली. दिल्लीत झालेल्या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री कायम असणार आहेत. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या पाठबळाबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात भाजप धन्यवाद यात्रा काढणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली. त्यानंतर आता शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपच्या धन्यवाद यात्रेवरुन टीका केली आहे.
महाराष्ट्रातील मतदारांचे आभार मान्यासाठी भाजपकडून धन्यवाद यात्रा काढण्यात येणार आहे. "लोकसभा निवडणुकीत मतदारांनी दिलेल्या पाठबळाबद्दल धन्यवाद व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रात भाजपा धन्यवाद यात्रा काढणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या पुढील ५ वर्षात होणारी विकासकामे व योजनांचा लाभ महाराष्ट्रातील जनतेला व महाराष्ट्राच्या विकासासाठी व्हायला हवा. महाराष्ट्रातील सर्व आमदार-खासदार, संघटनेतील सर्व पदाधिकारी जुलै महिन्यात धन्यवाद यात्रा काढणार आहे, ज्या मतदारांकडे आम्ही मत मागण्यासाठी जाऊ त्यांना मोदी सरकारच्या नवीन योजना देखील पोहचवणार आहोत," असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे.
भाजपच्या धन्यवाद यात्रेवरुन संजय राऊत यांनी बोचरी टीका केली आहे. "भाजप आता आभार, धन्यवाद यात्रा काढणार आहे. महाराष्ट्राने पराभव केल्याबद्दल. नरेंद्र मोदींना बहुमतमुक्त केल्याबद्दल. ४०० पार करणार होते पण २४० वर आणून ठेवल्याबद्दल आभार यात्रा काढणार आहेत. यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. भाजपवाले नशेत आहेत. पण तुम्हाला महाराष्ट्राने नाकरालं आहे. अयोध्येत प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा केली. मला वाटत होतं की मंदिरात प्रभू रामाची प्रतिष्ठापणा आहे की मोदींची. मी चार तास टीव्ही पाहत होतो पण मला रामाची मूर्ती दिसली नाही फक्त मोदीच दिसले. आता मोदींना राम दिसला असेल. देशाच्या जनतेने मोदींच्या हिंदुत्वाचा पराभव केला कारण ते नकली आणि ढोंगी होतं," अशी टीका संजय राऊत यांनी केली.
उद्धव ठाकरेंनी भाजपाचा खुळखुळा केला - संजय राऊत
"आपला महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. हा महाराष्ट्र तुमच्यासारख्या फडतूस लोकांबरोबर झुकणार नाही हे मोदी शाह यांना उद्धव ठाकरेंनी दाखवून दिलं. आज त्यांच्याकडे संपूर्ण देश अपेक्षेने पाहतो आहे. मोदी शाह यांचा पराभव अशक्य आहे, मोदी ४०० पार येणार हा त्यांचा जन्मसिद्ध हक्कच आहे असं वातावरण होतं. जन्माला येतानाच ते ४०० खुळखुळे घेऊन आले असंच चाललं होतं. मात्र उद्धव ठाकरेंनी मोदींचा आणि भाजपाचा खुळखुळा करुन दाखवला," असेही संजय राऊत यांनी म्हटलं.