Maharashtra Political Crisis: राष्ट्रवादीचे ४ आमदार बहुमत चाचणीवेळी गैरहजर? ठाकरे सरकार अडचणीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 29, 2022 11:17 AM2022-06-29T11:17:41+5:302022-06-29T11:18:08+5:30
राज्यातील शिवसेनेच्या ३९ नाराज आमदारांचा गट हा सरकारच्या विरोधात गेला आहे. तर काही अपक्षही शिंदे गटासोबत आहेत.
मुंबई - राज्यातील राजकारणात मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर भूकंप आल्याचं पाहायला मिळालं. शिंदे यांच्यासोबत शिवसेनेचे तब्बल ३९ आमदार महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात गेले. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सरकार नको अशी भूमिका या आमदारांनी मांडली. विधान परिषदेच्या निकालानंतर राजकीय हालचालींना वेग आला. गेल्या २१ जूनपासून शिवसेनेचे ३९ आणि अपक्ष १२ आमदार सूरतमार्गे गुवाहाटीला पोहचले.
आमदारांनी मविआ सरकारचा पाठिंबा काढल्यानंतर ठाकरे सरकार अल्पमतात आले. त्यात नऊ दिवसांनी या प्रकरणात भाजपाने थेट उडी घेत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली. या भेटीनंतर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणी घेण्याची सूचना केली. ३० जून म्हणजे उद्याच विधिमंडळाचं विशेष अधिवेशन भरवलं जाणार आहे. त्यामुळे सर्वच पक्षांनी आपापल्या आमदारांना मुंबईत हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. हे सरकार बहुमत चाचणीत टिकेल असा दावा मविआ नेते करत आहेत. परंतु संख्याबळात तुर्तास तरी हे चित्र दिसत नाही.
राज्यातील शिवसेनेच्या ३९ नाराज आमदारांचा गट हा सरकारच्या विरोधात गेला आहे. तर काही अपक्षही शिंदे गटासोबत आहेत. त्यात मविआमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे २ सदस्य अनिल देशमुख आणि नवाब मलिक हे जेलमध्ये आहेत आणि नुकतेच उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे. हे दोन्हीही नेते क्वारंटाईनमध्ये आहेत. त्यामुळे उद्याच्या बहुमत चाचणीसाठी राष्ट्रवादीचे ४ आमदार हजर राहण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे मविआ आणि उद्धव ठाकरेंसमोरील अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
माझ्या बोलण्याचा इतका त्रास होत असेल तर मी थांबतो- संजय राऊत
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी सगळ्यात जास्त रोष संजय राऊत यांच्यावर व्यक्त केला आहे. त्यावर राऊत म्हणतात की, मी शिवसेनेचीच भूमिका मांडत असतो. माझ्या नेत्यांची भूमिका मांडतो आहे. महाराष्ट्राच्या स्थिरतेसाठी बोलतो आहे. याचा जर कुणाला त्रास होत असेल तर ठीक आहे मी बोलणं थांबवतो. आपण आधी मुंबईत या. पण मी बोलतोय आणि आदित्य ठाकरे बोलताहेत म्हणून येणार नाही हा बालिशपणा आहे. आदित्य ठाकरे शिवसेनेचे नेते आहेत. ते ठाकरे आहेत. त्यांच्या बोलण्यावर आक्षेप घेण्यासारखं काहीच नाही. बंडखोरांनी आमच्या बोलण्याचं कारण देऊन अशी भूमिका घेणं योग्य नाही", असा टोला राऊतांनी लगावला आहे.