Maharashtra Political Crisis AIMIM Owaisi: महाराष्ट्रात उद्धव ठाकरे सरकारवर संकटाचे ढग दाटले आहेत. महाविकास आघाडी सरकारला गुरुवारी फ्लोअर टेस्ट म्हणजेच बहुमत चाचणीला सामोरे जावे लागणार आहे. सध्याची परिस्थिती महाविकास आघाडी सरकारच्या बाजूने नाही असे सध्या तरी दिसत आहे. महाविकास आघाडी 'नंबर गेम'मध्ये मागे पडल्याचे दिसून येत आहे. या दरम्यान, AIMIM प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. "राष्ट्रवादी आणि शिवसेनेची आघाडी कशी झाली? निवडणुकीच्या प्रचारावेळी तर तुम्ही म्हणत होतात की ओवेसीला मत देऊ नका, शिवसेना भाजपाला रोखण्यासाठी आम्हाला मतदान करा. मग निवडणुकीनंतर अचानक तुमची मनं कशी काय जुळली?", अशा रोखठोक शब्दांत ओवेसींनी महाविकास आघाडीला सवाल केले. याच वेळी फ्लोअर टेस्ट साठी एमआयएमचे आमदार उपस्थित राहणार का यावरही त्यांनी भाष्य केले.
AIMIM चे महाराष्ट्रात दोन आमदार आहेत. हे दोन्ही आमदार फ्लोअर टेस्टला उपस्थित राहतील की नाही याबाबत सध्या एआयएम प्रमुखांनी निर्णय घेतलेला नाही. त्याच वेळी, राज्यपालांनी ३० जुलै रोजी फ्लोअर टेस्टची घोषणा केली आहे. फ्लोअर टेस्ट सकाळी ११ वाजता सुरू होईल आणि कोणत्याही परिस्थितीत संध्याकाळी ५ वाजेपूर्वी पूर्ण करावी लागेल. मंगळवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे सरकारच्या विरोधात फ्लोअर टेस्टची मागणी करत राजभवनात गाठले. त्यानंतर शिवसेनेचे बहुतांश आमदार महाविकास आघाडीतून बाहेर पडले असून त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत राहायचे नाही, असे फडणवीस म्हणाले होते. उद्धव सरकार अल्पमतात आहे. या स्थितीत मुख्यमंत्र्यांनी सभागृहात बहुमत सिद्ध करावे, असे आदेश राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दिले.
AIMIM मध्य प्रदेश विधानसभा निवडणूकही लढवणार असल्याचे ओवेसींनी सांगितले. आम्ही हिंदूंच्या विचारधारेच्या विरोधात नाही तर सावरकरांनी लिहिलेल्या विचारसरणीच्या विरोधात आहोत. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीच्या विरोधात आहोत. महात्मा गांधींची हत्या करणाऱ्याचा धर्म कोणता होता? ज्याने राजीव गांधींची हत्या केली त्याचा धर्म काय होता? दिल्लीतील शीखांच्या हत्याकांडाला कोणता धर्म जबाबदार होता? छत्तीसगडमध्ये ज्यांनी आमचे जवान मारले त्यांचा धर्म काय होता? त्यामुळे भाजपने धर्मावर का बोलू नये? अशा शब्दांत त्यांनी भाजरावरही टीकास्त्र सोडले.