Maharashtra Political Crisis : सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला साथ दिली आहे. तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी उदय सामंत हे देखील गुवाहाटीला पोहोचले असून त्यांनीदेखील एकनाथ शिंदे यांना साथ दिली आहे. दरम्यान, उदय सामंत यांनी मात्र महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर मोठा आरोप केला आहे. राज्यसभेत शिवसेनेचा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून घटकपक्षांकडून प्रयत्न करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना पक्ष कमकुवत करण्याचे जे कारस्थान घटक पक्षांकडून सुरू आहे त्याला कंटाळून मी गुवाहाटी येथे आलो असल्याचं उदय सामंत म्हणाले. राज्यसभा निवडणुकीत संभाजीराजे छत्रपती यांना उमेदवारी नाकारून पक्षाने एका सच्चा शिवसैनिकाला राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला, मात्र त्या निवडणुकीत देखील हा उमेदवार निवडून येऊ नये म्हणून मित्रपक्षांनी प्रयत्न केले असल्याचा आरोप त्यांनी केला.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेले हिंदुत्व पुढे घेऊन जाणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे. असं असलं तरीही आजही मी शिवसेनेतच असून त्याबद्दल सर्वसामान्य शिवसैनिकांनी कोकणातील जनतेने कोणताही गैरसमज करून घेऊ नये, असं आवाहनही त्यांनी केलं.
लवकरच मुंबईत येणार - एकनाथ शिंदेदरम्यान, गुवाहाटीला असलेले काही आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला होता. यावर उत्तर देत एकनाथ शिंदे यांनी त्यांचं नावं सांगण्याचं आवाहन केलं. तसंच लवकरच आपण मुंबईत परतणार असल्याचंही ते म्हणाले.