Eknath Shinde Devendra Fadnavis CM: शिवसेना, महाविकास आघाडी विरूद्ध बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाचा पहिला अध्याय मावळते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनाम्यामुळे संपला होता. त्यानंतर एकनाथ शिंदे गोव्याहून मुंबईत आले. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत चर्चा करून राज्यपालांची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला एक भक्कम सरकार देण्यात येईल अशी जोरदार चर्चा काल रंगली होती. राजभवनात शपथविधीची वेळ ठरली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अशी शपथ घेतील असेही ठरल्याचे सांगितले जात होते. पण फडणवीस-शिंदे यांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत फडणवीसांनी वेगळीच घोषणा केली व साऱ्यांच्या भुवया उंचावल्या.
देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली २०१४ ते २०१९ या दरम्यान महाराष्ट्रातील सरकार चालवण्यात आले. २०१९ साली महाविकास आघाडीची चर्चा सुरू असताना देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादीतील बंडखोर अजित पवार यांनी सत्तास्थापनेचा दावा करत शपथ घेतली. पण त्यानंतर दीड दिवसांत हे सरकार कोसळले आणि महाविकास आघाडीचे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले. या सरकारमध्ये कोंडी होणाऱ्या काही बंडखोरांनी बंड केले. त्यानंतर काल उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिल्यानंतर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील असे बोलले जात होते. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी अख्खा खेळच पलटवला.
अमृता फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे दिले होते संकेत?
देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या गेल्या दोन-अडीच वर्षांत राजकीय विषयांवर मत मांडताना दिसल्या. उद्धव ठाकरे यांचे सरकार आल्यानंतर अमृता फडणवीस सातत्याने महाविकास आघाडी सरकारवर टीका करताना दिसल्या. शिवसेनेची सत्ता असलेल्या मुंबई महापालिकेच्या कारभारावरही अमृता फडणवीस यांनी टीका केली होती. तसेच एकनाथ शिंदे यांचे बंड सुरू झाल्यावरही त्यांनी बरीच वेळा टीका केली. पण देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार नसल्याचे संकेत अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणेच दिले होते अशीही चर्चा आहे. अमृता फडणवीस या देशाबाहेर काही कामानिमित्त गेल्या होत्या. राज्यात सत्तेची उलथापालथ सुरू असताना फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार अशी चर्चा रंगल्यानंतरही अमृता फडणवीस या देशाबाहेरच होत्या. अमृता यांचा राजकारणातील एकंदर रस पाहता फडणवीस मुख्यमंत्री होणार असते तर अमृता फडणवीस या लगबगीने भारतात आल्या असत्या. पण त्या भारतात परतल्या नाहीत, यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे संकेत दिले होते का? अशीही चर्चा सध्या सुरू आहे.