मुंबई - औरंगाबाद शहराचं नाव संभाजीनगर करावं अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून लावून धरण्यात आली होती. त्याला अखेर मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. शिवसेना मंत्र्यांनी हा प्रस्ताव कॅबिनेटसमोर आणला होता. त्यानंतर कॅबिनेटमध्ये या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. औरंगाबाद आणि उस्मानाबाद नामकरणास मंजुरी देण्यात आली आहे. यावरून भाजपाने ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. "अडीच वर्षे खुंटीला टांगून ठेवलेले हिंदुत्व जागृत झालेले दिसतेय" असं म्हणत मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका केली आहे.
भाजपाचे नेते अतुल भातखळकर (BJP Atul Bhatkhalkar) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "सत्ता सुंदरी सोडून जातेय हे लक्षात येताच गेली अडीच वर्षे खुंटीला टांगून ठेवलेले हिंदुत्व जागृत झालेले दिसतेय..." असं म्हणत टोला लगावला आहे. तसेच संभाजीनगर हा हॅशटॅग देखील वापरला आहे. यासोबतच "औरंगाबादचा पाणी प्रश्न सुटला? रस्ते गुळगुळीत झाले? अखंड वीज मिळू लागली? बूंद से गई सो हौद से नहीं आएगी, उध्दवजी..." असं देखील अतुल भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
भाजपाला धडा शिकविण्यासाठी शिवसेनेने अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी, काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. मात्र, आता एकनाथ शिंदेंनी शिवसेनेचे बहुसंख्य आमदारांना घेऊन ठाकरे सरकारविरोधात बहुमत चाचणीची वेळ आणली आहे. यामुळे दोन दिवस सलग ठाकरेंनी मंत्रिमंडळ बैठक बोलावली होती. आज उद्धव ठाकरे या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी मंत्रालयात आले होते.
यावेळी त्यांनी ज्या खात्यांचे विषय राहिलेले आहेत, ते पुढच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेऊ, असे आश्वासन दिले. याचबरोबर मला माझ्याच लोकांनी दगा दिला, त्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. तुम्ही सर्वांनी मला सहकार्य केले त्याबद्दल धन्यवाद. जर माझ्याकडून कोणाचा अपमान झाला किंवा दुखावले असतील तर मी माफी मागतो, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.