मुंबई - एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा त्यांना समोर येऊन चर्चा करण्याचं आवाहन केले आहे. शिंदे गटानं उद्धव ठाकरेंकडेभाजपासोबत युती करा अशी आग्रही मागणी केली आहे. राष्ट्रवादी शिवसेना संपवतेय असा आरोप बंडखोर आमदारांकडून केला जात आहे. त्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी आमदारांसाठी चर्चेची दारं खुली केली आहेत. याच दरम्यान भाजपाने ठाकरे सरकार आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
"आदित्य पक्षातील घाण गेली म्हणतात अन् मुख्यमंत्री आमदारांना आवाहन करतात, किती नाटकीपणा?" असं म्हणत निशाणा साधला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत काही ट्विट्स केले आहेत. "मुख्यमंत्री एकीकडे मंत्र्याचे खाती काढतात. आदित्य ठाकरे हे आमदारांना उद्देशून पक्षातील घाण गेली म्हणतात. संजय राऊत बळीची भाषा करतात आणि एवढ सगळं झाल्यावर परत उद्धव ठाकरे आमदारांना भावनिक आवाहन करतात. किती देखावा किती नाटकीपणा?" असं म्हटलं आहे.
केशव उपाध्ये यांनी "सत्ता गेली, संघटना गेली, सहानभूती, हिंदुत्व सुटलं पण गेली अडीच वर्षांचे मुख्यमंत्रीपद मिळाले पण वर्षानुवर्षांची पुण्याईसुध्दा गेली" असं म्हणत बोचरी टीका केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीनंतर आज पहिल्यांदाच एकनाथ शिंदे हे हॉटेलच्या गेटवर आले होते. यावेळी प्रसारमाध्यमांसोबत बोलत असताना एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला आव्हान दिले. 'आमचे कोणतेही आमदार कुणाच्या संपर्कात नाहीत, जे कुणी संपर्कात असतील, त्यांची नावं सांगा, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले आहे.
दोन-तीन दिवसात भाजपचे सरकार येणार आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार, असा विश्वास भाजप खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीची महापूजा त्यांच्या हस्ते होईल. त्याचसोबत फक्त आमदारच नाही तर शिवसेनेचे १०-१२ खासदारही एकनाथ शिंदे यांच्यासोबत असल्याचा दावा त्यांनी केला. सुप्रीम कोर्टाने बंडखोर आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईला १२ जुलैपर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे आमदारांवर कुठलीही कारवाई होणार नाही, असे खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले.