मुंबई - एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे आमदार उद्या मुंबईत येणार असल्याची माहिती खुद्द एकनाथ शिंदे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. ते कामाख्या देवीच्या दर्शनाला गेले असताना त्यांनी माध्यमांना माहिती दिली. तसंच उद्याच विधानसभेत बहुमत चाचणी होणार असल्याची माहिती समोर आली आहे. बहुमत चाचणीसाठी राज्यपालांनी उद्या विशेष अधिवेशन बोलवण्याचं पत्र राज्याचे मुख्य सचिव आणि मुख्यमंत्री कार्यालयाला पाठवलं आहे. उद्या सकाळी ११ वाजता विशेष अधिवेशन घेण्यात येणार असून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत बहुमत चाचणी घ्यावी लागणार आहे. याच दरम्यान भाजपाने ठाकरे सरकारवर बोचरी टीका केली आहे.
"सत्तेच्या मोहापाई हिंदुत्व गेलं, मंत्री गेले, आमदार गेले..." असं म्हणत जोरदार हल्लाबोल केला आहे. भाजपाचे नेते केशव उपाध्ये (BJP Keshav Upadhye) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "सत्तेच्या मोहापाई हिंदुत्व गेलं, मंत्री गेले, आमदार गेले... लोकशाहीत बहुमत असावं लागतं जे आज नाही. आता तरी मुख्यमंत्रीपदाचा मोह सोडून राजीनामा देत लोकभावनांचा आदर राखायला हवा" असं केशव उपाध्ये यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
केशव उपाध्ये यांनी "गेले एक आठवडा रोज संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमच्याकडे बहुमत आहे आम्ही विधानभवनात सिद्ध करू. आता राज्यपालांनी सांगितलं सिद्ध करा तर बहुमत चाचणी नको म्हणून कोर्टात गेली ही मंडळी" असं देखील म्हटलं आहे. सुप्रीम कोर्टानं ११ जुलैपर्यंत परिस्थिती जैसे थे ठेवण्यास सांगितलेलं असतानाही बहुमत चाचणी होणार असेल तर आम्ही सुप्रीम कोर्टात जाऊ, अशी भूमिका काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी घेतली आहे.
सरकार डळमळीत होण्याची भाजपा वाट पाहात होते. राज्यपालांकडे १२ आमदारांच्या नेमणुकीची फाइल गेल्या अडीच वर्षांपासून धूळखात पडून असताना विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी असंवैधानिक आहे. आम्ही १६ आमदारांवर कारवाईसाठीचीही पत्र दिलेलं आहे. त्यावरही अद्याप निर्णय झालेला नाही. त्यामुळे आम्ही नक्कीच सुप्रीम कोर्टात जाऊ असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.