महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. विरोधी पक्ष भाजपने केलेली मागणी राज्यपालांनी मान्य केली आहे. राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानभवन सचिवालयाला पत्र लिहून उद्याच म्हणजेच ३० जून रोजी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटानंही हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी या परिस्थितीवर भाष्य केलं आहे.
“२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत जनाधार हा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला मिळाला होता. हे विश्वासघातानं सरकार तयार झालं. तेच आज विश्वासघाताची भाषा करतात हे त्यांना शोभत नाही. सत्तेतून ते पायऊतार होतील असा विश्वास सामान्य जनतेच्या, भाजप कार्यकर्त्यांच्या मनात आहेत. येत्या आषाढीला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतील आणि तेच पूजा करतील असा विश्वास आमच्या मनात आहे,” असंही विखे-पाटील म्हणाले. माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान त्यांनी महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीवर आपलं मत व्यक्त केलं.
“शिवसेनेचं महाराष्ट्रातील अस्तित्व संपतंय”“संजय राऊत हा महत्त्वाचा मुद्दा नाही. तो यापूर्वीही नव्हता आणि आताही नाही. त्यांचं काय करायचं हा निर्णय उद्धव ठाकरेंनी घ्यायचा आहे. शिवसेनेचे महाराष्ट्रातील अस्तित्व संपतंय आणि अतिशय स्वाभिमानी मंडळी एकनाथ शिंदेंच्या निमित्तानं पुढे येतायत. राज्याला चांगलं सरकार देण्याची त्यांची तयारी झाली आहे. भाजप म्हणून आता आमची वेट अँड वॉचची भूमिका आहे,” असंही त्यांनी स्पष्ट केलं.