मुंबई - राज्यात भाजपा आणि शिवसेनेचा शिंदे गट यांनी एकत्र येत सत्तास्थापन केली आहे. या सर्व घडामोडीत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे राज्याचे मुख्यमंत्री असतील मी मंत्रिमंडळात सहभागी नसेन असं विधान देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले होते. त्यानंतर काही तासातच भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाने फडणवीसांच्या निर्णयाला बदलून त्यांना मंत्रिमंडळात सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर हा निर्णय देवेंद्र फडणवीसांना कळवण्यात आला. यानंतर देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले आहेत. याच दरम्यान देवेंद्र फडणवीस नाराज आहेत अशी चर्चा जोरदार रंगली होती.
भाजपाचे नेते सुधीर मुनगंटीवार (BJP Sudhir Mungantiwar) यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीनंतर प्रतिक्रिया दिली आहे. देवेंद्र फडणवीस नाराज होते का? आणि दिल्लीमध्ये नेमक्या कोणत्या हालचाली झाल्या? य़ावर भाष्य केलं आहे. "भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता सत्तेसाठी कधीच काम करत नाही. देवेंद्रजी यांचं मन विशाल आहे. राज्यामध्ये प्रगतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पाठीशी देवेंद्रजी यांनी आपला अनुभव उभा करावा हीच यामागची भावना आहे" असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देताना त्यांनी असं म्हटलं आहे.
"मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे शपथ घेतील हाच निर्णय होता, तो निर्णय बदलला नाही. त्या निर्णयाला उपमुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होतील ही जोड देण्यात आली. त्यामुळे कोणताच निर्णय बदलला नाही. फडणवीस सुरुवातीला सत्तेच्या बाहेर जाऊन आपला अनुभव शेअर करणार होते. पण राष्ट्रीय अध्यक्षांनी आग्रह केला, त्यांनी सांगितलं की, तुमचा पाच वर्षांचा विकासाचा, प्रगतीचा, राज्याच्या विकासाच्या गतीचा जो अनुभव आहे तो त्यांच्या पाठीशी असावा. व्यक्तिगत निर्णय या पक्षात होत नाहीत. नेतृत्व जे विचारपूर्वक सांगतं त्यावर आम्ही अमलबजावणी करतो. राज्यामध्ये प्रगतीसाठी एकनाथ शिंदेंच्या पाठीशी देवेंद्रजी यांनी आपला अनुभव उभा करावा हीच यामागची भावना आहे" असं देखील सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे.
एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद देऊन देवेंद्र फडणवीसांनी मोठा आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर त्यांनी आपण सरकारमध्ये सहभागी होणार नाही, मंत्री होणार नाही, अशी घोषणा करून आणखी एक मोठा धक्का दिला होता. मात्र, यानंतर काही वेळाने भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी फडणवीस उपमुख्यमंत्री होतील असे म्हटले. या साऱ्या घडामोडींमागे प्रदेशाध्यक्ष पद होते, हे समोर आले आहे. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा होती. २०२४ च्या निवडणुकांची तयारी त्यांना करायची होती. पक्ष बांधणी करायची होती, त्यासाठी त्यांना वेळ हवा होता. यामुळे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत शिंदेंची घोषणा करताना आपण मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही, असे म्हटले होते. परंतू आता फडणवीस यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी, शहा नड्डा यांनी फोन करून उपमुख्यमंत्री होण्यास सांगितले आहे. ते फडणवीस यांनी मान्य केले आहे, असे सूत्रांनी सांगितले.