मुंबई - मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंड पुकारल्यानंतर आता पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा त्यांना समोर येऊन चर्चा करण्याचं आवाहन केले आहे. शिंदे गटानं उद्धव ठाकरेंकडे भाजपासोबत युती करा अशी आग्रही मागणी केली आहे. राष्ट्रवादी शिवसेना संपवतेय असा आरोप बंडखोर आमदारांकडून केला जात आहे. त्यात पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी आमदारांसाठी चर्चेची दारं खुली केली आहेत.
वाचा उद्धव ठाकरेंनी केलेले आवाहन जसच्या तसं...
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे गुवाहाटी येथील शिवसेना आमदारांना आवाहन
शिवसैनिक आमदार बांधवानो आणि भगिनींनो
जय महाराष्ट्र !
आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात . आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे , आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत आपण आजही मनाने शिवसेनेत आहात . आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत , आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो , कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो अजूनही वेळ गेलेली नाही , माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे , आपण या माझ्या समोर बसा , शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा , यातून निश्चित मार्ग निघेल , आपण एकत्र बसून यातून मार्ग काढू . कोणाच्याही कोणत्याही भूल थापांना बळी पडू नका , शिवसेनेने जो मान सन्मान तुम्हाला दिला तो कुठेही मिळू शकत नाही , समोर आलात बोललात तर मार्ग निघेल . शिवसेना पक्ष प्रमुख आणि कुटुंब प्रमुख म्हणून आजही मला तुमची काळजी वाटत आहे . समोर येऊन बोला आपण मार्ग काढू.
आपला नम्र उद्धव बाळासाहेब ठाकरे शेवट गोड करा, सगळं सुरळीत होईल - शिंदे गटजे २०-२१ आमदार संपर्कात आहेत तर नावं सांगा आजच पाठवून देतो. उगाच दिशाभूल करण्याचं राजकारण करू नका. राज्यातील जनतेने ज्या राष्ट्रवादीला हरवलं त्यांनाच शिवसेनेचे सत्तेत आणले. आता हीच राष्ट्रवादी शिवसेना संपवायला निघायली. आमच्या आमदारांनी करायचं काय? आमच्या पक्षप्रमुखांनी विचार करावा. किती काळ वाट बघत बसायची. थांबण्यालाही मर्यादा असतात. लेखी आवाहन केलय. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊ नका. बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी नेते होते. शेवट गोड करा. सगळं काही सुरळीत होऊ शकतं असं दीपक केसरकरांनी सांगितले.