शिवसेनेतील फाटाफूट पाहून काँग्रेस सावध; सोनिया गांधींनी विश्वासू नेत्याकडे दिली जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2022 04:17 PM2022-06-21T16:17:04+5:302022-06-21T16:18:41+5:30

Maharashtra Political Crisis : शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर आल्यानंतर काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. 

maharashtra political crisis congress appoints kamal nath as observer | शिवसेनेतील फाटाफूट पाहून काँग्रेस सावध; सोनिया गांधींनी विश्वासू नेत्याकडे दिली जबाबदारी

शिवसेनेतील फाटाफूट पाहून काँग्रेस सावध; सोनिया गांधींनी विश्वासू नेत्याकडे दिली जबाबदारी

Next

मुंबई : काल झालेल्या विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Elections) राज्यात राजकीय भूकंप आला आहे. शिवसेना (Shiv Sena) नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्षाविरोधात बंड केले आहे. एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेसह राज्यातील राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे. दरम्यान, शिवसेनेतील अंतर्गत धुसफूस बाहेर आल्यानंतर काँग्रेसने सावध पवित्रा घेतला आहे. 

महाराष्ट्रात निर्माण झालेल्या राजकीय संकटावर चर्चा करण्यासाठी काँग्रेसने कमलनाथ (Kamal Nath) यांची पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. महाविकास आघाडीच्या घटकपक्षांसोबत कमलनाथ हे चर्चा करणार आहेत. यासंदर्भात काँग्रेसचे सचिव केसी वेणुगोपाल यांनी पत्राद्वारे माहिती दिली आहे. दरम्यान, कमलनाथ हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांचे विश्वासू नेते मानले जातात.  

विशेष म्हणजे, काँग्रेसचे नेते कमलनाथ हे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असताना ज्योतिरादित्य शिंदे यांनीच बंड करत भाजपसोबत हात मिळवणी केली होती. त्यावेळी ज्योतिरादित्य शिंदे यांच्यासह काही आमदार काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर कमलनाथ यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. कमलनाथ यांच्या राजीनाम्यानंतर मध्य प्रदेशात पुन्हा एकदा भाजपने सरकार स्थापन करत शिवराजसिंह चौहान यांना मुख्यमंत्री बनविले आहे.

काँग्रेसला 10 आमदारांची चिंता
काल झालेल्या विधान परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव झाला. काँग्रेसमध्येच क्रॉस व्होटिंग झाल्यामुळे आणि काही मत फुटल्यामुळे काँग्रेसच्या गोटातही चिंतेचे वातावरण आहे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वाखाली 10 आमदारांसह बाहेर पडण्याचा तयारीत असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. दरम्यान, विधान परिषदेच्या निकालानंतर नाराज झालेले राज्याचे मंत्री आणि काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात हे विधीमंडळ गटनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारला मोठे हादरे बसण्यास सुरुवात झाली आहे.

Web Title: maharashtra political crisis congress appoints kamal nath as observer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.