मुंबई - शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि आमदारांचे बंड चपळाईने हाताळले असते तर महाविकास आघाडी सरकार उद्धव ठाकरे वाचवू शकले असते असा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केला आहे. विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्याऐवजी राजीनामा देण्यापर्यंत. बंडखोरी शमवण्यासाठी घेतलेल्या अनेक निर्णयामुळे काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंच्या कार्यप्रणालीवर नाराज असल्याची बातमी आहे.
बंडखोरीची चर्चा सुरू असताना काँग्रेसच्या एका ज्येष्ठ कॅबिनेट मंत्र्याने उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि एकनाथ शिंदे यांना पुढील मुख्यमंत्री म्हणून घोषणा करावी असा सल्ला दिला होता. मात्र दिवसेंदिवस अधिकाधिक मंत्री आणि आमदारांची संख्या शिंदे गटात सहभागी होण्यासाठी वाढत राहिली अशी माहिती इकोनॉमिक्स टाईम्सनं सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे.
त्याचसोबत काँग्रेस मंत्र्याने दुसरी सूचना दिली होती ती म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारला बाहेरून पाठिंबा देईल. बहुमत चाचणी पुढे ढकलण्यात यावी या शिवसेनेच्या याचिकेवर जेव्हा कोर्टाने नकारात्मक निकाल दिला तेव्हा रात्री उद्धव ठाकरेंनी जनतेशी संवाद साधला. या संवादात उद्धव ठाकरे स्वत: महाविकास आघाडी सरकार वाचवण्यासाठी, शिवसेनेतील बंडखोरी रोखण्यासाठी काँग्रेस बाहेरून पाठिंबा देण्यासाठी तयार झाली होती. मंत्री अशोक चव्हाणांनी मला ते सांगितले असं विधान उद्धव ठाकरेंनी केले होते. काँग्रेसनं दिलेल्या २ सूचनांपैकी ती एक सूचना होती.
....अन् उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिलाविधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे काही आमदार नॉट रिचेबल झाल्याचं समोर आले. सुरुवातीला हा आकडा १५-२० आमदारांपर्यंत मर्यादित होता. त्यानंतर तातडीने उद्धव ठाकरे यांनी सर्व आमदारांना मुंबईत बोलावले. या बैठकीला उपस्थित झालेले आमदार, मंत्रीही टप्प्याटप्प्याने एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. त्यामुळे शिवसेनेसमोरील अडचणी वाढत गेल्या. त्यात विधानसभेत बहुमत चाचणीला सामोरे जाण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एकत्र येत राज्यात सत्तांतर घडवलं. मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावर आली. आम्हीच शिवसेना आहोत असा दावा एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या ४० आमदारांकडून सातत्याने केला जात आहे. त्यामुळे शिवसेना कुणाची यावरूनही उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात कायदेशीर लढाई तीव्र होणार असल्याचं समोर येत आहे.