Maharashtra Political Crisis: कमलनाथ घेणार काँग्रेस आमदारांची बैठक, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांचीही भेट घेणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 10:50 AM2022-06-22T10:50:25+5:302022-06-22T10:56:57+5:30
Maharashtra Political Crisis: विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठी बंडखोरी पाहायला मिळाली आहे. सेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे 35-40 आमादारांना घेऊन गुवाहाटी येथे दाखल झाले आहे. त्यांच्या बंडखोरीमुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे.
मुंबई: विधान परिषद निवडणुकीनंतर शिवसेनेत मोठी बंडखोरी पाहायला मिळाली आहे. सेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे 35 आमादारांना घेऊन गुजरातला गेले, त्यानंतर तेथून गुवाहाटी येथे दाखल झाले आहे. त्यांच्या बंडखोरीमुळे सरकार कोसळण्याची शक्यता आहे. त्यांच्यासोबत 5 अपक्ष आमदारांचाही पाठिंबा आहे. यातच, काँग्रेसचेही आमदार येतील, असा दावा बच्चू कडू यांनी केला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे पर्यवेक्षक कमलनाथ काँग्रेस आमदारांची बैठक घेणार आहेत.
मुख्यमंत्र्यांची भेट घेणार
शिवसेनेत वादळ निर्माण झाल्यानंतर आता याचा नवा अंक आज गुवाहटीत पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसोबत आज पहाटे गुवाहटीला पोहोचले आहेत. गुवाहटीच्या रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आमदारांना ठेवण्यात आले आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील या राजकीय भूकंपाच्या पार्श्वभूमीवर मध्य प्रदेशचे माजी मुख्यंत्री कमलनाथ यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीला 43 आमदार उपस्थित राहतील. या बैठकीनंतर कमलनाथ आणि काँग्रेसचे इतर नेते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची भेट घेऊ शकतात.
दिलीप वळसे पाटील शरद पवारांच्या भेटीला:-
#WATCH | Maharastra Home Minister Dilip Walse Patil arrives at the residence of NCP chief Sharad Pawar in Mumbai. pic.twitter.com/Bhv8gxW2oJ
— ANI (@ANI) June 22, 2022
एकनाथ शिंदेना मुंबईतच यावे लागणार
महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झालेला असतानाच राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना कोरोनाची लागण झाल्याने पुढे काय, असे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. कोश्यारी यांना रिलायन्स हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. यामुळे त्यांचा चार्ज गोव्याच्या राज्यपालांकडे देण्यात येणार असल्याचे वृत्त होते. परंतू, राज्यपाल कार्यालयाने कोणाकडेही चार्ज दिला जाणार नसल्याचे म्हटले आहे. राज्यपाल भवनाने कोश्यारींचा चार्ज आपल्याकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या राज्यापालांकडे चार्ज दिला जाणार नाही, असे राज्यपाल भवनाकडून स्पष्ट करण्यात आहे. राज्यपाल व्हिडीओ कॉ़न्फरन्सींगद्वारे उपलब्ध असतील असे म्हटले आहे. यामुळे शिंदे यांना राज्यपाल भवनात यावे लागणार आहे.