Maharashtra Political Crisis: सरकारला पाठिंबा कायम; बहुमत मविआचेच, काँग्रेसचा मोठा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2022 06:55 AM2022-06-24T06:55:12+5:302022-06-24T06:55:47+5:30
Maharashtra Political Crisis: बहुमताचा आकडा आजही उद्धव ठाकरे यांच्याकडे असून महाविकास आघाडी सरकारला काँग्रेसचा पाठिंबा कायम असेल, अशी भूमिका प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आली.
मुंबई : राज्यात सध्या सुरू असलेल्या राजकीय अस्थिरतेला भारतीय जनता पक्षच जबाबदार आहे. ईडीची भीती दाखवून सरकार पाडण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. मात्र बहुमताचा आकडा आजही उद्धव ठाकरे यांच्याकडे असून महाविकास आघाडी सरकारला काँग्रेसचा पाठिंबा कायम असेल, अशी भूमिका प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांच्या बैठकीत घेण्यात आली.
सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या या बैठकीला प्रभारी एच. के. पाटील, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते व महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मंत्री अशोक चव्हाण, मंत्री नितीन राऊत, दुग्धविकास व पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार आदी उपस्थित होते.
पटोले यांनी सांगितले की, महाविकास आघाडी सरकारला कसलाही धोका नसून हे सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल. बहुमताचे संख्याबळ अजूनही उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहे. त्यामुळे सरकारला धोका नाही. शिवसेनेत जे काही चालले आहे ते लवकरच थांबेल. काँग्रेस पक्ष हा महाराष्ट्र विकास आघाडीबरोबरच आहे. भाजपने सरकार पाडण्यासाठी कितीही प्रयत्न केले तरीही यात ते यशस्वी होणार नाहीत.