मुंबई - महाराष्ट्रात जे काही घडतंय त्याला उद्धव ठाकरेंचा आशीर्वाद असावा असं आम्हाला वाटतं. भाजपा-शिवसेना ही नैसर्गिक युती आहे. आगामी महापालिका निवडणुकीत शिवसेनेची सत्ता अबाधित राहिली पाहिजे. आमच्या पक्षाला कुणी संपवणार असेल तर त्याच्याविरुद्ध केलेले बंड हे उद्धव ठाकरेंविरोधात नाही. उद्या मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आमची नाही का? हात जोडून विनंती करतो. आम्ही सगळं विसरून जातो. जनतेने जो निर्णय घेतला त्याच्या बरोबर जाऊया, आजचा शेवटचा दिवस आहे, कितीवेळ आम्ही आवाहन करणार, शेवट गोड करा अशी विनंती शिंदे गटाचे आमदार दीपक केसरकर यांनी केली आहे.
दीपक केसरकर म्हणाले की, २०-२१ आमदार संपर्कात आहेत तर नावं सांगा आजच पाठवून देतो. उगाच दिशाभूल करण्याचं राजकारण करू नका. राज्यातील जनतेने ज्या राष्ट्रवादीला हरवलं त्यांनाच शिवसेनेचे सत्तेत आणले. आता हीच राष्ट्रवादी शिवसेना संपवायला निघायली. आमच्या आमदारांनी करायचं काय? आमच्या पक्षप्रमुखांनी विचार करावा. किती काळ वाट बघत बसायची. थांबण्यालाही मर्यादा असतात. लेखी आवाहन केलय. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊ नका. बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी नेते होते. शेवट गोड करा. सगळं काही सुरळीत होऊ शकतं असं त्यांनी सांगितले.
तसेच ठाकरे कुटुंबाची बदनामी होत असताना मी सगळ्यात आधी पुढे आलोय. मला गद्दार म्हणण्याचा नैतिक अधिकार शिवसैनिकांना नाही. चांगल्या गोष्टी घडत नसतील तर त्याला जबाबदार त्या गोष्टी न घडवणारेही आहेत. आमच्यावरील टीका किती सहन करायची? १७ केसेस आमच्यावर आहे. गुलाबराव पाटील, दादा भूसे, संजय राठोड यासारखे किती शिवसैनिक आहेत ज्यांनी शिवसेनेसाठी संघर्ष भोगलाय. आमच्यावर गद्दारीचा शिक्का का मारतायेत. कुणीही तुमच्या संपर्कात नाही. तत्वांशी जोडले आहेत. १ आमदार ५ दिवसाचे फाईव्ह स्टार हॉटेलचं बिल भरू शकत नाही. शेवट गोड करा, त्यातच महाराष्ट्राचं भलं आहे असा अल्टिमेटम शिंदे गटानं उद्धव ठाकरेंना दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींशी बोलावंआमचा संयम सुटत चालला आहे. दिल्लीतील भाजपा नेत्यांशी उद्धव ठाकरेंनी बोलावी. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर उद्धव ठाकरेंच्या आशीर्वादाने व्हावेत अशी इच्छा आहे. कुठेतरी भाजपा-शिवसेनेचं वितुष्ट संपवावं, शेवट गोड व्हावा. भाजपाचे प्रमुख मोदीजी तुम्हाला लहान भाऊ मानतात. तुम्ही थेट त्यांच्याशी बोला असं आवाहन केसरकरांनी केले आहे.