विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर काँग्रेसमध्ये भूकंप होण्याची शक्यता असताना शिवसेनेतच एकनाथ शिंदे यांनी मोठा भूकंप घडवून आणला आहे. रातोरात शिवसेनेच्या निम्म्या आमदारांना घेऊन ते सूरतला गेले आहेत. दुसरीकडे भाजपा, शिवसेना, राष्ट्रवादीचे नेते विजयाचा जल्लोष करण्यात व्यस्त असताना शिंदेंनी मविआच्या बुडाखाली सुरुंग पेरल्याने त्याचा हादरा गल्लीपासून दिल्लीपर्यंत बसला आहे.
एकनाथ शिंदे गायब झालेले असताना दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखील गायब झाल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. नाशिकमध्ये योग दिनाच्या कार्यक्रमाला फडणवीस जाणार होते. परंतू ते तिथे पोहोचलेच नाहीत. त्र्यंबकेश्वर येथे अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या वतीने सद्गुरु मोरेदादा चॅरिटेबल हॉस्पिटलच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी फडणवीस रात्रीच येणार होते. मात्र, ते आलेच नाहीत.
राज्यात एवढी मोठी घडामोड घडत असताना फडणवीस कुठेत, याची चर्चा सुरु झाली. यावर फडणवीस यांनी पहाटेच मुंबई सोडल्याचे समोर आले. फडणवीस हे सकाळीच दिल्लीला रवाना झाले. शिंदे यांचे बंड शमले नाही तर राज्यात सत्तापरिवर्तन होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एकनाथ शिंदे हे आज दुपारी सूरतमध्येच पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचे वृत्त आहे. तर एकनाथ शिंदे यांच्या नाराजीमुळे राज्यातील राजकारणात भूकंप झाला असून, त्यांची नाराजी दूर करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच एकनाथ शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार वास्तव्य करून असलेल्या हॉटेलबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.