सध्या महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघत आहे. शिवसेनेच्या अनेक आमदारांनी एकनाथ शिंदे यांच्या गटाला साथ दिली आहे. तर दुसरीकडे बंडखोर आमदार शिवसेनेनं भाजपसोबत युती करण्याची मागणी करत आहे. असं असताना मात्र संजय राऊत यांनी माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना एक सल्ला दिला आहे.
“इतका मोठा विरोधीपक्ष महाराष्ट्रात कधी निर्माण झाला नव्हता. त्याच्यामुळे हा विरोधीपक्ष चांगलं काम करू शकतो आणि महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो ही कायम भूमिका आहे. देवेंद्र फडणवीसांमध्ये ती क्षमता आहे. त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं आहे. पण त्यांनी सध्या जे डबकं झालं आहे त्यात उतरू नये. त्यांना एक मित्र म्हणून सांगणं आहे,” असं संजय राऊत म्हणाले.
ज्या प्रकारचं डबकं आता राजकाणात तयार केलंय, डबक्यात बेडूक राहतात. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षानं या डबक्यात उतरून काही करण्याचा प्रयत्न केला, तर पक्षाची, पंतप्रधान मोदींची आणि देवेंद्र फडणवीस यांची कमालीची अप्रतिष्ठा होईल असं माझं स्पष्ट आणि परखड मत आहे. मला खात्री आहेत ते या डबक्यात, नरकात उडी मारणार नाही, असंही ते म्हणाले.
निलंबन होणारच..जे काही बंडखोर आमदार वागले आहेत, ते योग्य नाही. कायद्याच्या मंदिरात गेल्यानंतर तारीख पे तारीख चालत राहील. हे आमदार जेव्हा मुंबईत येतील, तेव्हा त्यांच्यासोबत नीट बोलणे करता येईल. निलंबन त्यांनी तूर्तास टाळले आहे; मात्र ते होणारच. त्यात बदल होणार नाही. स्वत:ला शिवसेनेचे वाघ म्हणवतात; मग त्यांना मुंबईत यायला भीती का वाटते? असाही प्रश्न राऊत यांनी यापूर्वी केला होता.