मुंबई - गेल्या अनेक दिवसांपासून राज्याच्या सत्तानाट्यात सुरू असलेला सत्तासंघर्ष अखेर नवीन सरकारच्या बहुमत चाचणीत संपुष्टात आला. एकनाथ शिंदे यांच्यासोबत ४० आमदारांनी शिवसेनेत बंड पुकारल्यामुळे राज्यातील सरकार अल्पमतात आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. सोमवारी विधानसभेत शिंदे सरकारकडून विश्वासदर्शक ठराव मांडला. त्यात १६४ आमदारांनी भाजपा-शिंदे सरकारच्या बाजूने मतदान केले.
शिंदे सरकारने बहुमत चाचणी जिंकल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस Devendra Fadnavis यांनी आभार प्रदर्शन करताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्या पत्राचाही विशेष उल्लेख केला. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अतिशय सुंदर पत्र लिहिलं. खरंतर मी या पत्राला दुसऱ्या दिवशी उत्तर देण्याचा विचार केला. परंतु त्यांच्यासारखे शब्द मला सुचले नाहीत. मग मी त्यांना फोन करून आभार मानले. सध्या त्यांची तब्येत बरी नाही. मात्र लवकरच आम्ही त्यांची भेट घेऊ असं फडणवीसांनी सांगितले.
तसेच आपण सगळे राजकीय विरोधक आहोत, शत्रू नाहीत. काही लोकं इकडच्या लोकांवर ईडी म्हणून ओरडत होती. हे खरेच आहे. ती ईडीमुळेच इथे आली. ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहे. राजकारणात दोन्ही बाजू असतात. आमच्या एका एका नेत्यावर ३० खटले दाखल केलेत. खासदारांवर माझी गाडी देवदर्शनाला नेली त्याचे भाडे दिले नाही म्हणून केस झाली. हनुमान चालीसा म्हटली म्हणून घर तोडणार. माझे मुंबईत घर नाही ते बरे आहे. मी शासकीय बंगल्यात राहतो आणि नागपूरचं घर कायद्यात आहे असा टोला देवेंद्र फडणवीसांनी शिवसेनेला लगावला.
दरम्यान, हनुमान चालीसा वाचतो बोलले त्यानंतर जेलमध्ये पाठवलं. यावर स्वातंत्र्य चर्चा होईल. दोन्हीकडच्या व्यथा कशा दूर करता येईल. महाराष्ट्रात दक्षिण भारतासारखी परिस्थिती नाही. महाराष्ट्रात राजकीय नेते एकमेकांच्या घरी जाऊ शकतात. जेवण करू शकतात. सत्तारुढ, विरोधकांची भूमिका वेगळी असू शकते. सत्ता येते आणि जाते. सत्तेचा अहंकार कधीही ठेऊ नये. जो निवडून येतो त्याला ५ वर्षाने परीक्षा द्यायची असते परंतु अनेकदा तो असा वागतो की त्याला जन्मभर आमदार, खासदार, मंत्रीच राहायचं. लोकप्रतिनिधींना जनतेच्या प्रश्नांना उत्तरं द्यावी लागतात. हे सरकार कुठल्याही बदल्याच्या भावनेने वागणार नाही अशी ग्वाही देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
एकनाथ शिंदे जनसामान्यांना उपलब्ध असतीलएक शिवसैनिक राज्याचे मुख्यमंत्री झालेत. एकनाथ शिंदे यांची कारकिर्दी पाहिली तर राज्यात नेत्यांच्या उपलब्धतेची एक स्पेस तयार झालीय. आता येत्या काळात हा नेता जनसामान्यांना उपलब्ध असेल. केवळ मुंबईतच नाही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध असेल. एका कॉलवरच उपलब्ध असेल. शेवटच्या घटकापर्यंत त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करेल अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कौतुक केले.