मुंबई - राज्याच्या राजकारणात गेल्या १० दिवसांपासून सुरू असलेल्या सत्तानाट्यात अखेर गुरुवारी मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी शपथ घेतली. त्यानंतर भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या आदेशाचं पालन करत देवेंद्र फडणवीसही मंत्रिमंडळात सहभागी झाले. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. गुरुवारीच्या घडलेल्या राजकीय ट्विस्टमुळे सगळ्याच नेत्यांना धक्का बसला. भाजपाच्या स्थानिक नेत्यांसह कुणालाही शिंदे मुख्यमंत्री बनतील याची कल्पना नव्हती.
त्यात देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री बनवल्याने काहीशी निराशा पसरल्याचंही पाहायला मिळालं. राज्यातील या घडामोडीत रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी सागर बंगल्यावर जात देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मुंडे-फडणवीस यांच्या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. धनंजय मुंडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय आहेत. २०१९ मध्ये जेव्हा अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांसोबत शपथविधी सोहळा पार पडला. तेव्हा धनंजय मुंडे हे नॉट रिचेबल होते. त्यामुळे राज्यात झालेल्या सत्तांतरानंतर धनंजय मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने विविध चर्चा सुरू झाल्या आहेत.
राष्ट्रवादीची सावध प्रतिक्रियादेवेंद्र फडणवीस हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस हे भाजपात असताना कायम एकत्र राहिले आहेत. त्यांचे संबंध चांगले आहेत. धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे नेते आहेत. सदिच्छा भेट म्हणून धनंजय मुंडे घेतले असतील. शुभेच्छा देण्यासाठी मुंडे गेले असतील असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी म्हटलं.
धनंजय मुंडे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात जवळपास अर्धा तास भेट झाली. या भेटीत नेमकं काय चर्चा झाली हे अद्याप समोर आली नाही. मात्र रात्री साडेबारा वाजता धनंजय मुंडे यांनी फडणवीसांची भेट घेतली. सध्याच्या राजकीय घडामोडीत या भेटीला विशेष महत्त्व आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे मविआ सरकार कोसळलं आहे. तर सुरुवातीला यात कुठेही भाजपाचा हात आहे असं दिसत नाही असं विधान अजित पवारांनी केले होते. राज्यातील सत्तानाट्यावर आक्रमक भाष्य करणंही अजितदादांनी टाळलं. त्यात धनंजय मुंडे हे अजित पवारांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे नेमकं पडद्यामागे काय सुरू आहे याचं उत्तर आगामी दिवसात सगळ्यांसमोर येऊ शकतं.