मुंबई: शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी केल्यामुळे राज्यातील सरकार कोसळण्याची शक्यता आहे. दरम्यान, एकनाथ शिंदेंसोबत बंडखोरी केल्यामुळे इतर आमदारांना प्रचंड विरोधाचा सामना करावा लागत आहे. बंडखोर आमदारांना शिवसैनिकांकडून जोरदार विरोध होताना दिसत आहे. यातच, शिंदे गटात सामील असलेले शिवसेनेचे बंडखोर आमदार डॉ. बालाजी किणीकर (Dr. Balaji kinikar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.
अंबरनाथ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार बालाजी किणीकर यांना धमकीचे निनावी पत्र मिळाले आहे. याप्रकरणी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. आमदार किणीकर यांना आज एका अज्ञात इसमाने पत्राद्वारे धमकी पत्र पाठवले आहे. याबाबत किणीकर यांचे ऑफिस क्लार्क प्रकाश भोगे यांनी अंबरनाथमधील शिवाजी नगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज सादर केला आहे.
पत्रात काय म्हटले?बंडकोर आमदार बालाजी किणीकर यांना मिळालेल्या पत्रात म्हटले की, 'आमदार बालाजी तेरेको गोली मारने का दिन आ गया है. हमारे अंबरनाथ के शिवसेना नेता को तकलीफ देता है इसिलिए तुझे मारनेका है, बता इसलिये रहा हु जब में मारूंगा वह दिन तय हे. तब तक टू रोज डर डर के जिये,' असे पत्रात म्हटले आहे.
बंडखोर आमदार गोव्याला रवानाआज सकाळी कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर शिवसेनेचे बंडखोर आमदार गुवाहाटीमधील हॉटेलवरून रवाना झाले आहेत. सुमारे तीन तासांच्या प्रवासानंतर ते गोव्यात दाखल होणार आहेत. हे सर्व बंडखोर आमदार उद्या मुंबईत येतील. गुवाहाटीत कामाख्या देवीचे दर्शन घेतल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना, आम्ही मुंबईत पोहोचणार आहोत. आमच्याकडे पन्नास आमदार आहेत. फ्लोअर टेस्ट किंवा अन्य कोणतीही प्रक्रिया असेल त्यामध्ये आम्ही सहभागी होणार आहोत, असे ते म्हणाले.