महाराष्ट्रातील गेल्या आठवड्यापासून सुरु असलेल्या राजकीय घडामोडी आता अखेरच्या टप्प्यात पोहोचल्या आहेत. एकनाथ शिंदे गट आता थोड्याच वेळात गुवाहाटीहून गोव्याकडे रवाना होतील. यासाठी विशेष विमान गुवाहाटीच्या विमानतळावर आलेले आहे. अशातच कामाख्या देवीचे दर्शन घेऊन बाहेर आलेल्या एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे.
उद्या आम्ही मुंबईत पोहोचणार आहोत. आमच्याकडे पन्नास आमदार आहेत. शिवसेना ४० आणि १० समर्थक. यामुळे उद्याची फ्लोअर टेस्ट किंवा अन्य कोणतीही प्रक्रिया असेल त्यामध्ये आम्ही सहभागी होणार. लोकशाहीत कायदा, संविधान आणि नियमांच्या पुढे जाऊन कोणी काहीही करू शकत नाही. आम्हीच उद्या जिंकणार, अशा शब्दांत शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिले आहे.
याचबरोबर आम्ही उद्या बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाला उद्या भेट देणार. सर्व आमदारांनी आज कामाख्या देवीचे दर्शन घेतले आहे. एक वेगळा आनंद आणि समाधान या आमदारांमध्ये आहे. इथे सर्वांनी मोकळ्या वातावरणात दर्शन घेतले. कोणी बळजबरीने ठेवलाय, असे दिसले का? असा सवाल शिंदे यांनी केला.
शरद पवार काय म्हणाले...
महाविकास आघाडीच्या या बैठकीत शरद पवारांनी काही महत्वाच्या सूचना दिल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व कायदेशीर मार्ग अवलंबून पाहायचे. तसेच संध्याकाळी ५ वाजता सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय येईल, त्यानंतर पुढील रणनीती ठरवण्यात येईल, असं बैठकीत ठरविण्यात आले. जर फ्लोअर टेस्टची वेळ आली तर त्याला सामोरे जायचं. शेवटपर्यंत महाविकास आघाडी टिकावी, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची, चर्चा बैठकीत झाल्याची माहिती समोर आली आहे.