एकनाथ शिंदे यांच्याकडे आता शिवसेनेचे आमदारा आणि खासदार खेचून येऊ लागले असून गुवाहाटीमध्ये शिवसेना आणि अपक्ष आमदारांचे संख्याबळ वाढू लागले आहे. कालपर्यंत मुंबईत असलेले आमदार आता गुवाहाटीला जाऊन पोहोचले आहेत.
असे असताना रामटेकचे शिवसेना समर्थक आमदार आशिष जैस्वाल यांनी शिंदे यांनी दिलेली जबाबदारी पार पाडली आहे. शिंदे यांनी बंड केल्यापासून मुंबईतील हॉटेलमध्ये असलेले शिवसेना आमदार मंगेश कुडाळकर, संजय राठोड, दादा भुसे, दीपक केसरकर, सदा सरवणकर आता गुवाहाटीला पोहोचले आहेत.
या पाच आमदारांच्या जथ्थ्याचे एकनाथ शिंदे यांनी हॉटेलबाहेर येत स्वागत केले. हे सर्व आमदार काल नॉट रिचेबल झाले होते. सायंकाळपर्यंत शिंदे यांच्या गटात ४२ शिवसेना आमदार आणि ८ अपक्ष असे मिळून ५० जण सहभागी होणार आहेत. यानंतर शिंदे हे शिवसेना गटाचे पत्र विधान सभा उपाध्यक्षांकडे सादर करण्याची शक्यता आहे.
मी देखील मुळचा शिवसैनिक आहे, आमचे शिवसेनेवर प्रेम आहे. आम्ही एवढ्या मोठ्या संख्येने का आलो, याचा विचार करणे गरजेचे आहे, असे जैस्वाल म्हणाले.
शिवसेना नेते, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाने सध्या पक्षांतर बंदी कायदा, राष्ट्रपती राजवटीवर चर्चा झडत आहेत. शिंदे आणि त्यांची सहकाऱ्यांनी अद्याप शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केलेला नाही. उलट पक्षनेतृत्वानेच सत्तेपायी पक्षाच्या विचारधारेशी तडजोड केली. हिंदुत्वाच्या मूळ विचारधारेपासून फारकत घेतल्याचा पवित्रा घेतला आहे, तर दुसरीकडे निम्म्याहून अधिक आमदार सध्या शिंदे यांच्या तंबूत दाखल झाल्याने संख्याबळाचेही गणित मांडले जात आहे. त्यामुळे आता शिवसेना नेमकी कुणाची, असाच प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे. हे गृहीत धरूनच दोन्ही बाजूंनी प्रस्तावांचे आणि पत्राचे राजकारण सुरू झाले आहे.