मुंबई - विधान परिषदेच्या निकालानंतर मंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे. शिंदे यांच्यासह शिवसेनेचे ३९ आमदार गुवाहाटीला पोहचले आहेत. त्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यभरात शिवसैनिक संतप्त झाले आहे. ठिकठिकाणी रस्त्यावर उतरून बंडखोर आमदारांचा निषेध केला जात आहे. तोडफोड, पुतळे जाळले जात आहेत.
मात्र एकनाथ शिंदे यांचा गड मानला जाणाऱ्या ठाण्यात शिंदे समर्थकांनी शक्तीप्रदर्शन करत थेट शिवसेनेलाच आव्हान दिले. ठाण्यात अनेक शिवसेनेचे पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. त्यात ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांचाही समावेश होता. मात्र म्हस्के यांनी शिंदे यांच्या समर्थनार्थ राजीनामा दिला. तर शिंदे यांच्या शक्ती प्रदर्शनात सहभागी झाल्यामुळे आता पक्षविरोधी कारवायाचं कारण देत ठाणे जिल्हासंघटक मिनाक्षी शिंदे यांची हकालपट्टी करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी दिले आहेत.
याबाबतचं पत्र शिवसेनेचे सचिव विनायक राऊत यांनी दिले आहे. त्यात म्हटलंय की, ठाणे जिल्हा संघटक मिनाक्षी शिंदे यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे मुख्यमंत्री, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने त्यांची शिवसेना पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबतचं पत्रक शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आले आहे.
ठाण्यात शिंदे समर्थकांचे आंदोलन२५ जूनला सायंकाळी शिंदे यांच्या लुईसवाडी येथील निवासस्थानाबाहेर त्यांच्या समर्थकांनी मोठी गर्दी करत घोषणा दिल्या. समर्थकांनी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या फलकांसह ‘शिवसेना’ नावाचा उल्लेख असलेले आणि ‘धनुष्यबाणा’ची निशाणी असलेले झेंडे हातात धरले होते. या वेळी एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी गाडीवर उभे राहून समर्थकांशी संवाद साधला. लुईसवाडी परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तसेच रस्ते बंद केले होते. ठाणे येथे विविध भागातून शिंदे समर्थकांचे समूह या ठिकाणी येत होते. ठाणे येथील शिवसेनेचे अनेक माजी नगरसेवक आणि पदाधिकारीही या ठिकाणी उपस्थित होते. माजी महापौर, तसेच ठाणे जिल्हा महिला प्रमुख मिनाक्षी शिंदे यांचीही या ठिकाणी उपस्थिती होती.
शिंदे गटातील काही आमदार संपर्कात - राऊतकोर्टाच्या निर्णयानंतर बंडखोर आमदारांमध्ये चलबिचल सुरू झाली आहे. यातील सर्वांनाच मी बंडखोर म्हणणार नाही. त्यातील काहीजण आमच्या संपर्कात आहेत. गुवाहाटीत बसून उद्धव ठाकरे यांना सल्ले देऊ नका. मुंबईत या चर्चा करा असं आवाहनही राऊतांनी केले आहे. त्याचसोबत राज्यात निर्माण झालेल्या राजकीय डबक्यात देवेंद्र फडणवीस यांनी उतरू नये असंही संजय राऊत म्हणाले आहेत.
शेवट गोड करा, सगळं सुरळीत होईल - शिंदे गटजे २०-२१ आमदार संपर्कात आहेत तर नावं सांगा आजच पाठवून देतो. उगाच दिशाभूल करण्याचं राजकारण करू नका. राज्यातील जनतेने ज्या राष्ट्रवादीला हरवलं त्यांनाच शिवसेनेचे सत्तेत आणले. आता हीच राष्ट्रवादी शिवसेना संपवायला निघायली. आमच्या आमदारांनी करायचं काय? आमच्या पक्षप्रमुखांनी विचार करावा. किती काळ वाट बघत बसायची. थांबण्यालाही मर्यादा असतात. लेखी आवाहन केलय. काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊ नका. बाळासाहेब ठाकरे हिंदुत्ववादी नेते होते. शेवट गोड करा. सगळं काही सुरळीत होऊ शकतं असं दीपक केसरकरांनी सांगितले.