मुंबई-
"आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेससोबत जायचं नाही. महाविकास आघाडीनं आपली नाटकं आता थांबवावीत. आमची हात जोडून विनंती आहे की आता ताणून धरू नका. तुमच्याकडे बहुमत नाही हे मान्य करा", असं विधान एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आमदार दिपक केसरकर यांनी केलं आहे. तसंच अविश्वासदर्शक ठरावाबाबत बोलत असताना त्यांनी याबाबत आता थेट राज्यपालांनीच निर्णय घ्यावा असंही साकडं घातलं आहे.
निव्वळ भूलथापा! उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये फोनवर चर्चा नाही, शिवसेनेचं स्पष्टीकरण
"राज्यपालांनी आता सरकारनं तीन दिवसात काढलेल्या जीआरची माहिती मागवली आहे. त्याचप्रमाणे ते आता सुप्रीम कोर्टात आमच्या याचिकेची दखल घेतील आणि स्वत:हून अविश्वास दर्शक ठराव आणावा, अशी मागणी दिपक केसरकर यांनी केली आहे. राज्यात आता महाविकास आघाडीकडे बहुमत राहिलेलं नाही हे सर्वांना माहित आहे. शिंदे गटात असलेले आमदार आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे पक्षप्रमुखांना माझी विनंती आहे की त्यांनी याची दखल घेऊन आता भाजपाशी बोलून तडजोड करुन सन्माननं सरकार स्थापन करावं, असंही केसरकर म्हणाले. तसंच काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत राहण्याचीच त्यांची भूमिका अजूनही कायम असेल तर तेही त्यांनी स्पष्ट सांगावं. आम्ही काही केलं तरी आता राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत येणार नाही, असं ठाम मत दीपक केसकर यांनी व्यक्त केलं आहे.
राऊतांनी आम्हाला परत येण्यापासून रोखलंराज्यातील सत्तासंघर्ष केव्हा संपणार आणि तुम्ही सर्व केव्हा परतणार याबाबत दीपक केसरकर यांना विचारण्यात आलं असता त्यांनी आम्हाला संजय राऊत यांनी महाराष्ट्रात येण्यापासून रोखलं आहे. त्यांनाच विचारा, असा आरोप केला आहे. "संजय राऊत यांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर उतरवलं आहे. आमची कार्यालयं फोडली जात आहेत. धमक्या दिल्या जात आहेत. मग अशा परिस्थितीत कसं परतणार? संजय राऊत यांनीच आम्हाला परत येण्यापासून रोखलं आहे. त्यामुळे आम्ही कधी परत येणार हे त्यांनाच विचारा", असं दीपक केसरकर म्हणाले.
फडणवीस रात्री १२ वाजताही फोन उचलतातदीपक केसरकर यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचंही कौतुक केलं. "देवेंद्र फडणवीस यांच्याशी आमचा राजकारणाच्या पलिकडे जाऊन वैयक्तिक पातळीवरही चांगले संबंध आहेत. त्यांनी मतदार संघाशी निगडीत कामांसाठी रात्री १२ वाजता देखील आमचे फोन उचलले आहेत. त्यामुळे एका भाजपा शासित राज्यात जर आम्ही असून आणि त्यांनी आम्हाला मदत केली तर यात चुकीचं काय?", असं सवाल दिपक केसरकर यांनी उपस्थित केला.